जयपूर : ‘‘जी मंडळी धर्म किंवा जातीच्या नावावर मते मागतात ते त्यांच्या कामाच्या आधारावर मते मागू शकत नाहीत,’’ अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी केली. केकरी आणि जहाजपूर येथील विधानसभा निवडणूक प्रचारसभांमध्ये बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी येथे केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रियंका म्हणाल्या, की राजस्थानमध्ये काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने निवडणूक लढवत आहे. मात्र, येथे भाजप पूर्णपणे विस्कळीत आहे. भाजपचे बहुसंख्य नेते धर्म-जातीचे मुद्दे उपस्थित करतात. निवडणुकीच्या वेळीच धर्म-जातीचे मुद्दे कसे उपस्थित होतात, याचा जनतेने विचार करावा.
हेही वाचा >>> शेखावटी प्रदेशातील जाटांचा कौल भाजपसाठी निर्णायक
काँग्रेससाठी घराणेशाही, भ्रष्टाचार सर्वस्व -पंतप्रधान
जयपूर : राजस्थानातील सत्ताधारी काँग्रेससाठी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालनाचे राजकारण सर्वात महत्त्वाचे आहे. दलितांवर अत्याचार होत असताना काँग्रेसच्या डोळय़ांवर पट्टी बांधलेली असते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी केली. पाली येथे प्रचारसभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले की, सध्या अवघा देश विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे. एकविसाव्या शतकात भारत ज्या उंचीवर असेल त्यात राजस्थानचा मोठा वाटा असेल. त्यामुळे राजस्थानमध्ये विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे सरकार असणे आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांपासून येथे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने जनतेची पीछेहाट केली आहे. राजस्थान विकासात मागे पडले आहे. येथील काँग्रेस सरकारसाठी भ्रष्टाचारापेक्षा मोठे काहीही नाही. येथील काँग्रेस सरकारसाठी घराणेशाही हेच सर्वस्व आहे. दलितांवर अत्याचार करणाऱ्यांकडे काँग्रेस काणाडोळा करते असा आरोप केला.