राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. “निवडणुकीत भाजपा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करते. पण, यंदा हे चालणार नाही. ज्याप्रमाणे कर्नाटकात भाजपाची रणनिती फसली आणि काँग्रेसचा विजय झाला. त्याप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपाचा पराभव होणार आहे. भाजपा संवेदनशील विधानांचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करेल, असा आरोपही अशोक गेहलोत यांनी केला आहे. ते ‘एनडीटीव्ही’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने राबवलेल्या योजनांच्या माध्यमातून भाजपाच्या आक्रमक प्रचाराचा विरोध करण्यास मदत होणार आहे,” असं अशोक गेहलोत यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…आम्हाला लाज वाटते”, योगेंद्र यादव, सुहास पळशीकरांचा NCERT चं सल्लागारपद सोडण्याचा निर्णय

माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी झालेल्या वादावर अशोक गेहलोत म्हणाले की, “यावर कोणतंही भाष्य करणार नाही आहे. अलीकडेच दिल्लीत आमची एकमेकांबरोबर चर्चा झाली आहे. तिथे राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के. सी वेणुगोपाल आणि सुखजिंदर सिंग रंधावा सुद्धा होते. जर, मी कोणतेही भाष्य केलं, तर चुकीचा संदेश जाऊ शकतो.”

माजी मुख्यमंत्री आणि वसुंधरा राजे यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन अशोक गेहलोत यांनी दिलं आहे. “आम्ही वसुंधरा राजे यांच्यावर जे काही आरोप केले होते, ती सर्व प्रकरण न्यायालयात नेण्यात आली आहेत. नवीन किंवा प्रलंबित प्रकरणे असो, सामान्य नागरिकाने याबद्दल सांगितलं, तरी आम्ही कारवाई करू,” असं अशोक गेहलोत म्हणाले.

हेही वाचा : भाजपमधील फेरबदलांपूर्वी ‘मुख्यमंत्री संमेलना’कडे लक्ष

“काँग्रेसची तत्वे आणि धोरणंच देशाला वाचवू शकतात. लोकशाहीवर विश्वास नसलेल्या ‘फॅसिस्ट शक्तीं’चा पराभव करणे आमचं ध्येय असणार आहे,” असं अशोक गेहलोत यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan assembly election cm ashok gehlot said why won bjp win now ssa