जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. कल्याणकारी योजना आणि जातीनिहाय सर्वेक्षणाचे आश्वासन हे या जाहीरनाम्याचे वैशिष्टय़ आहे. शेतकरी आणि युवकांसाठी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. तरुणांसाठी १० लाख नोकऱ्या, तसेच पंचायत स्तरावर नोकरभरतीसाठी नवीन योजना राबवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गेहलोत सरकारच्या महत्त्वाकांक्षी चिरंजीवी आरोग्य विमा योजनेअंतर्गत वार्षिक विम्याची रक्कम २५ लाखांवरून ५० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. लहान व्यापाऱ्यांना पाच लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याचीही घोषणा पक्षाने केली आहे. जातीनिहाय सर्वेक्षणानंतर अल्पसंख्याकांना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पक्षाच्या कार्यालयात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सी पी जोशी आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी संयुक्तपणे हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
हेही वाचा >>> तेलंगणातील काँग्रेस उमेदवारावर ईडीची कारवाई
या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दय़ांची माहिती देताना जोशी यांनी सांगितले की, काँग्रेसला पंचायत राजनुसार पंचायत स्तरावर नोकऱ्या सुरू करायच्या आहेत. त्यासाठी नवीन धोरण आखले जाईल. राज्यात १० लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती केली जाईल आणि त्यामध्ये चार लाख नोकऱ्या सरकारी क्षेत्रातील असतील. राज्यात सध्या मनरेगा योजनेअंतर्गत वर्षांला १२५ दिवस काम दिले जाते, ते वाढवून १५० दिवस केले जाईल.
याशिवाय शेतकऱ्यांना सहकारी बँकांकडून दोन लाखांपर्यत व्याजमुक्त कर्ज आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे किमान आधारभूत किमतीचेही आश्वासन देण्यात आले आहे.
सात हमी योजना पूर्वीच जाहीर
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सात हमी यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये महिला कुटुंबप्रमुखाला वर्षांला १० हजार रुपये मानधन, १ कोटी ०५ लाख कुटुंबांना ५०० रुपयांना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, गुराख्यांकडून दोन रुपये प्रतिकिलो दराने शेणाची खरेदी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना, सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा टॅब्लेट, नैसर्गिक संकटात झालेल्या हानीसाठी प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण आणि इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण यांचा समावेश आहे.