नवी दिल्ली: भाजपने राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली. इथेही मध्यप्रदेशप्रमाणे ७ खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजीमंत्री राज्यवर्धन राठोड, नरेंद्र कुमार, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, किरोडीमल मीणा, भागीरथ चौधरी, देवजी पटेल हे सात खासदार सदस्य आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप, काँग्रेसची कसोटी
राजस्थानच्या या यादीमध्ये वसुंधरा राजे, केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल यांच्या नावाचा समावेश झालेला नाही. केंद्रीय मंत्र्यांनाही निवडणुकीत उतरवले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मध्य प्रदेशमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीतून राजेंच्या दोन समर्थक आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पक्षाचे माजी उपाध्यक्ष भैरवसिंह शेखावत यांचे पुत्र नरपाल रजवी यांच्याऐवजी खासदार दिया कुमारी व राजपाल सिंह शेखावत यांच्याऐवजी राज्यवर्धन राठोड यांना संधी देण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये तीन खासदारांना उमेदवारी
छत्तीसगडमधील ६४ उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर करण्यात आली असून ३ खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदिवासी कल्याण मंत्री रेणुका सिंह, अरुण साव व गोमती साय या संसद सदस्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर लगेचच भाजपने उमेदवारांच्या नव्या याद्या जाहीर केल्या. छत्तीसगढमधील २६ उमेदवारांची पहिला यादी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वी जाहीर केली गेली होती.
शिवराजसिंह चौहान रिंगणात!
मध्य प्रदेशमधील ५७ उमेदवारांची तिसरी यादीही पक्षाने जाहीर केली असून बुधनीमधून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना पुन्हा दतिया मतदारसंघातून संधी दिली आहे.