मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन होणार हे निश्चीत असलं तरीही काँग्रेसच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचं चित्रं स्पष्ट झालंय मात्र अद्याप राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. दोन वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलेले अशोक गेहलोत आणि तरुण तडफदार नेता सचिन पायलट यांच्यापैकी एकजण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसणार हे नक्की आहे, पण दोघांपैकी नेमकं कोण मुख्यमंत्री होणार हे अजुनही ठरलेलं नाहीये. आज दुपारपर्यंत दोघांपैकी एकाच्या नावाची घोषणा केली जाईल असं सांगितलं जात आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांचे समर्थक आपआपल्या पद्धतीने पक्षश्रेष्ठींवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, काहींनी तर थेट राजीनाम्याचं पाऊल उचललं आहे. सचिन पायलट यांच्याशी जवळीक असलेले आणि राज्य काँग्रेसचे प्रवक्ता इंदर मोहन सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाच्या घोषणेला उशीर होत असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
सभी कार्यकर्ताओं से शांति एवं अनुशासन बनाए रखने का आग्रह करता हूँ। मुझे पार्टी के शीर्ष नेतृत्व पर पूरा विश्वास है, माननीय राहुल गाँधी जी एवं श्रीमती सोनिया गाँधी जी जो फ़ैसला लेंगे उसका हम स्वागत करेंगे।हम सभी कांग्रेस के समर्पित,पार्टी की गरिमा बनाये रखना हम सभी की ज़िम्मेदारी
— Sachin Pilot (@SachinPilot) December 13, 2018
राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत यांना पक्षनेतृत्वाची पसंती असल्याची चर्चा होती. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांची गुरुवारी सकाळी स्वतंत्रपणे चर्चा केली. पायलट यांना समजावण्याचे काम अहमद पटेल यांच्याकडे दिले होते मात्र, पायलट यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने गेहलोत यांच्या नावाची घोषणा होऊ शकली नाही. सचिन पायलट यांना न दुखावता गेहलोत यांची नियुक्ती करण्यावर पक्षनेतृत्वाचा भर होता. पण, मुख्यमंत्री न बनवल्यास राज्यात चुकीची संदेश जाईल, असे पायलट यांचे म्हणणे होते. पायलट यांची मनधरणी करण्यात अपयश आल्याने राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा वाद रात्री उशिरापर्यंत कायम होता. चर्चेच्या फेऱ्याहूनही निर्णय घेतला न गेल्याने दोघांच्याही समर्थकांत असंतोष धुमसत होता. गेहलोत समर्थक काही अपक्ष आमदारांनी उघडपणे पायलट यांच्या नावाला विरोध केल्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करणे अवघड होत गेले. गेल्या चार वर्षांत सचिन पायलट यांच्या परिश्रमामुळेच राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष उभा राहिला असल्याने तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा मुद्दा गांभीर्याने विचारात घेण्यात आल्याचे समजतेय.
दरम्यान, मी सर्व पक्ष कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन करतो. पक्षनेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आपल सर्वांनी स्वागत करुया. काँग्रेस पक्षाचं नाव खराब होईल असं कोणतंही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी, आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे, असं ट्विट सचिन पायलट यांनी केलं आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसला दोन तृतियांश बहुमत मिळेल असा होरा होता. तसे झाले तर तरुण मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलटच मुख्यमंत्री होतील, असे गृहित धरले गेले होते. मात्र, राजस्थानमध्ये काँग्रेसने जेमतेम बहुमताचा आकडा गाठला आहे. बसपचे ६ आमदार तर अपक्ष तब्बल २० आहेत. त्यांच्या मदतीशिवाय राजस्थानमध्ये स्थिर सरकार देणे अवघड होईल. अशावेळी राज्यावर पकड असलेला नेताच मुख्यमंत्रीपदी निवडला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे दोन वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलेले अशोक गेहलोत यांच्या नावावरही चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांनी गेहलोत यांना पक्षाचे सरचिटणीस नेमून दिल्लीत आणले होते. मात्र, गेहलोत यांचा ओढा राजस्थानकडेच राहिला आहे. समन्वय साधून सत्ता राबवण्याचे कसब असलेला ‘काँग्रेसी’ वळणाचा नेता म्हणुून गेहलोत यांच्याकडे पाहिले जाते. काठाच्या बहुमतावर अपक्षांना आणि बसपला एकत्र घेऊन राज्य सांभाळण्याची कुवत गेहलोत यांच्याकडे आहे. शिवाय, अन्य काँग्रेस नेत्यांप्रमाणे अजूनही महत्त्वाकांक्षी असल्याने ते मुख्यमंत्रीपदासाठी आपली ताकद पणाला लावतील. अशा स्थितीत अननुभवी सचिन पायलट यांच्यापेक्षा गेहलोत यांचीच निवड करणे राहुल गांधी यांना भाग पडेल, असे सांगितले जातेय. त्यामुळे आता पायलट की गेहलोत दोघांपैकी मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.