अनेकदा मुलींचा बालविवाह होत असेल तर तिचे लग्न रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र राजस्थानमध्ये एका १९ वर्षीय मुलाने फोन करून त्याचा बालविवाह करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. हे प्रकरण दौसाच्या सिकराई येथील आहे. सोमवारी त्याचे लग्न होणार होते. पण त्याने राज्य बाल आयोगाला फोन करून याबाबत माहिती दिली आणि हे लग्न थांबवले.
तक्रारदार मुलगा बारावीचा विद्यार्थी आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याने पुढे शिक्षण घ्यायचे असल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच बाल आयोगाने जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्याचे लग्न कायदेशीररित्या ठरवून दिलेल्या वयाच्या २१ व्या वर्षीच व्हावे, याकडे प्रशासनाला लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. राजस्थान बाल हक्क अध्यक्षा संगीता बेनीवाल यांनी सांगितले की, एखाद्या मुलाने फोन करून लग्न मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. बेनिवाल यांच्या म्हणण्यानुसार, मुलाने फोन करून सोमवारी लग्न असल्याचे सांगितले होते. लग्नपत्रिकेच्या फोटोसोबत त्यांनी वयाचा पुरावा म्हणून दहावीच्या गुणपत्रिकेचा फोटोही पाठवला होता. यानंतर बेनिवाल यांनी अधिकाऱ्यांना बोलावून लग्न थांबवण्याच्या सूचना दिल्या.
मुलेही बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवत आहेत ही चांगली गोष्ट आहे, असे बेनिवाल म्हणाल्या. नुकतीच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाची पाचव्या सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे. २८.२ टक्के मुलांनी कायदेशीर वय पूर्ण करण्यापूर्वीच लग्न केले होते. त्याच वेळी, २५.४ टक्के मुलींचे कायदेशीर वय पूर्ण होण्यापूर्वीच लग्न झाले होते. मात्र, राजस्थानमध्ये बालविवाहाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. ग्रामीण भागामध्ये २०१५-१६ मध्ये राजस्थानमध्ये ४४.७ टक्के बालविवाह नोंदवले गेले. तर २०१९-२० मध्ये हे प्रमाण ३३.२ टक्क्यांवर आले होते.
दरम्यान, राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील मालपुरामध्ये एका मुलीचा बालविवाह करण्यात आला. शनिवारी या अल्पवयीन मुलीने पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठून पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि बालविवाहातून मुक्ती मिळावी, अशी मागणी केली. तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झाले.