Rajasthan By-Election independent candidate Slapped Malpura SDM : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवळी-उनियारा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. येथून निवडणुकीला उभे राहिलेले अपक्ष उमेदवार नरेश मीना यांनी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या कानशीलात लगावल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मतदारसंघात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या मागण्यांवरून चौधरी व नरेश मीना यांच्यात वाद चालू होता. त्याचदरम्यान, मीना यांचं स्वतःवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी थेट उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर हल्ला केला. मीना यांनी चौधरी यांच्या कानशीलातही लगावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवळी उनियारा विधानसभा मतदारसंघातील समरावता गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. ग्रामस्थांचं म्हणणं होतं की त्यांचं गाव पूर्वी उनियारा उपखंडात होतं. मात्र, आधीच्या सरकारने त्यांचं गाव उनियारामधून हटवलं आणि देवळी उपखंडात समाविष्ट केलं आहे. त्यामुळे ग्रामस्थ सरकारवर नाराज आहेत. ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचं गाव उनियारामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकारने त्यावर कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. परिणामी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

हे ही वाचा >> पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष

समरावता गावात काय घडलं?

या मागणीमुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर स्थानिक पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. अधिकारी ग्रामस्थांचं समुपदेशन करत असतानाच नरेश मीना तिथे आले. यावेळी त्यांची उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्याबरोबर बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर मोठ्या भांडणात व हाणामारीत झालं. मीना यांनी चौधरींना मारहाण केली. जवळच उभे असलेल्या पोलिसांनी चौधरी यांना मीना यांच्या तावडीतून सोडवलं. मीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

हे ही वाचा >> Donald Trump : एलॉन मस्क, विवेक रामास्वामींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश; करणार नोकरशाहीची साफसफाई

पेटलेले टायर्स फेकून पोलिसांची कार अडवली

मीना यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घराजवळ येत असताना मीना यांच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून टाकले होते. मीनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार पुढे जाऊ दिली नाही. बुधवारी रात्री समरावता गावात तणाव निर्माण झाला होता. मीना समर्थकांनी गावात अनेक ठिकाणी जाळपोळ केली आहे. या जाळपोळीचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, अजमेरचे पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश यांनी सांगितलं आहे की हिंसाचार करणाऱ्या ६० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan by election naresh meena independent candidate assaults malpura sdm amit chaudhary asc