राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत फेसबुकवरील आपली प्रसिद्धी दर्शविण्यासाठी ‘लाईक्स’ खरेदी करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला असून, त्यामुळे सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या राजकारणाने एक नवे वळण घेतले आहे. याचा ‘सोशल मीडिया घोटाळा’ असा उल्लेख करीत भाजपच्या  प्रवक्त्या ज्योती किरण म्हणाल्या, गेहलोत यांचे फेसबुक पेज एक समर्पित तांत्रिक गट चालवत असून, १ जूनपर्यंत या पेजचे १,६९,०७७ इतके लाईक्स होते, ज्यातील सर्वाधिक लाईक्स मागील आठवड्यात (५ मे) आले, तथापि, ३० जूनपर्यंत या आकड्याने २,१४,६३९ पर्यंत उसळी घेतली, ज्याने मागील आठवड्याच्या आकडेवारीलासुद्धा मागे टाकले.
फेसबुकवरील ‘मोस्ट पॉप्युलर सिटी’ हा विभाग जास्त फॉलोअर्स कोणत्या शहरातून आले आहेत हे दर्शवितो. एक जूनपर्यंत गेहलोत यांच्या फेसबुक पेजवर जयपूर ही ‘मोस्ट पॉप्युलर सिटी’ होती, परंतु, लाईक्समध्ये अचानक झालेल्या वाढीने यात बदल होऊन ‘मोस्ट पॉप्युलर सिटी’ इस्तम्बुल झाली असल्याचा दावा किरण यांनी केला.
काही आयटी कंपन्या एक गठ्ठा ‘लाईक्स’ विकण्याचा धंदा करत आहेत. ज्यामुळे एखाद्याच्या प्रसिद्धीचे चुकीचे चित्र सादर केले जात आहे. गेहलोत हे इस्तम्बुलमध्ये अचानक इतके चर्चित व्यक्तिमत्व कसे बनले, हा खरा प्रश्न असल्याचे किरण म्हणाल्या. गेहलोत यांनी इस्तमबुलमधील आयटी कंपन्यांकडून ‘लाईक्स’ खरेदी केले असल्याचा दावा किरण यांनी केला असून कॉंग्रेस पक्ष सोशल मीडियावर चुकीची प्रतिमा सादर करण्याचे पायंडे घालत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या अर्चना शर्मा यांनी आरोपाचे खंडन केले. त्या म्हणाल्या, राजस्थानचे मुख्यमंत्री खूप प्रसिद्ध असून, त्यांना इतक्या खालच्या पातळीवर येण्याची गरज नाही. फेसबुकवरील लाईक्स कोठूनही येऊ शकतात, अगदी अमेरीकेतूनसुद्धा येऊ शकतात. यात एव्हढे संशय घेण्यासारखे काय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan cm ashok gehlot buying likes on facebook bjp