Bhajan Lal Sharma Viral Video: राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भजन लाल शर्मा यांनी दिलेल्या या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओचा दाखला देऊन काँग्रेसकडून भजन लाल शर्मा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेसच्या राजस्थानमधील नेत्यांसह केंद्रातील नेतेमंडळीदेखील या विधानावरून खोचक टीका करताना दिसत आहेत.

काय म्हणाले भजन लाल शर्मा?

भजन लाल शर्मा यांनी रविवारी जयपूर येथे झालेल्या आयफा अर्थात इंटरनॅशनल इंडिय फिल्म अकॅडेमी (IIFA) पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी भजन लाल शर्मा यांना कार्यक्रमाच्या अनुषंगाने “तुमचा आवडता अभिनेता कोण आहे?” असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी हसत “नरेंद्र मोदी” असं उत्तर दिलं!

भजन लाल शर्मा यांनी दिलेलं हे उत्तर विरोधी पक्ष काँग्रेसच्या पथ्यावर पडलं. काँग्रेसचे राजस्थान प्रदेाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. “आम्ही तर हे बऱ्याच काळापासून सांगत आहोत की मोदी हे नेते नसून अभिनेते आहेत. उशीराने का होईला, अगदी भाजपाचे मुख्यमंत्रीदेखील हे सांगू लागले आहेत की नरेंद्र मोदी हे जनतेचे नेते नसून अभिनेते आहेत. ते कॅमेरा कौशल्य, टेलिप्रॉम्प्टर, वेशभूषा, मोठमोठी भाषणं यात वाकबगार आहेत”, असं दोतासरा यांनी म्हटलं आहे.

पवन खेरांनी शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भजन लाल शर्मा यांचा हा व्हिडीओ शेअर केला असून शर्मा यांना टॅग करून टोला लगावला आहे. “भजन लाल जी, तुमचं बरोबर आहे. पंतप्रधान मोदी हे चांगले अभिनेते आहेत. पण तुम्हाला असं वाटत नाही का की कधीकधी ते खूप जास्त ओव्हरअॅक्टिंग करतात?” असा खोचक सवाल पवन खेरा यांनी उपस्थित केला आहे.

आम आदमी पक्षानंही केलं लक्ष्य

काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षानंही भजन लाल शर्मा यांच्या या विधानावरून मोदींवर टीका केली आहे. “आता भाजपाचे मुख्यमंत्री व नेत्यांनाही विश्वास बसला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा अभिनेता या देशात कधीही झाला नाही आणि कधी होणारही नाही”, अशी पोस्ट आपच्या अधिकृत एक्स हँडलवर करण्यात आली आहे.

प्रश्न नेमका काय होता?

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून मात्र भजन लाल शर्मा यांना “तुमचा आवडता हिरो कोण?” असा प्रश्न विचारल्याचा दावा करण्यात येत आहे. पण या प्रसंगाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पत्रकारांनी “तुमचा आवडता अभिनेता कोण?” असा प्रश्न विचारल्याचं ऐकू येत आहे.

Story img Loader