काही दिवसांपूर्वी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला असून भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं. मात्र, यानंतर वसुंधरा राजे किंवा चर्चेतील कोणतंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी न निवडता भाजपानं भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. भजनलाल शर्मा यांचा शुक्रवारी शपथविधी पार पडला. या शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत भाजपाचे अनेक वरीष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मात्र, यावेळी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी केलेल्या एका चुकीची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

५६ वर्षीय भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळेच भाजपाच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील इतर अनेक दिग्गज नेत्यांना डावलून भजनलाल शर्मा यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं आहे. त्यापाठोपाठ राजस्थानमधली राजघराण्यातील दिया कुमारी व प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. राज्यपाल कालराज मिश्रा यांनी या तिघांना शपथ दिली.

Rajasthan New CM : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री; छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाचे धक्कातंत्र

सूत्रसंचालकांची ‘ती’ चूक व्हायरल!

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असे अनेक दिग्गज उपस्थित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांची ओळख करून देताना सूत्रसंचालकांनी केलेली चूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

नेमकं काय घडलं?

शपथविधी सोहळ्यासाठी सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यासपीठावर आगमन होताच समोर बसलेल्या श्रोत्यांबरोबरच व्यासपीठावरील मान्यवरांनीही उभं राहून त्यांना अभिवादन केलं. त्यावेळी सूत्रसंचालन करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याने मोदींची ओळख “मु्ख्यमंत्री नरेंद्र मोदी” अशी करून दिली. यामुळे काही काळ व्यासपीठावरील मान्यवरांबरोबरच समोर उपस्थित श्रोत्यांमध्येही चलबिचल झाली. ‘मुख्यमंत्री’ अशी ओळख होताच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही काही क्षण सूत्रसंचालकांकडे पाहात राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

यासंदर्भातले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजस्थान भाजपाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या व्हिडीओमध्ये हा प्रसंग दिसत आहे. खुद्द मोदींसह व्यासपीठावरील सर्व नेत्यांना ही चूक लक्षात आली खरी. मात्र, त्यानंतर त्यावर फारशी चर्चा न होता पुढील कार्यक्रम नियोजित क्रमाने पार पडला!

Story img Loader