Rajasthan Education Department Website Hack : राजस्थानच्या शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ही वेबसाईट हॅक करण्यात आल्यानंतर त्या वेबसाईटच्या होमपेजवर एक संदेश लिहिण्यात आला आहे. त्यामध्ये २०१९ मध्ये हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवरून भारताची खिल्ली उडवली आहे.
तसेच गेल्या आठवड्यात काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आला होता. दरम्यान, या संपूर्ण घटनेची राजस्थान शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी गंभीर दखल घेतली असून यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. राजस्थान शिक्षण विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेतली असून शिक्षण विभागाची आयटी टीम याबाबत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राजस्थानच्या शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक झाल्यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत ही वेबसाईट बंदच होती. याबाबत शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी सांगितलं की, वेबसाईट तात्पुरती बंद करण्यात आली आहे आणि वेबसाईट पुन्हा सुरु करण्यासाठी काम सुरु आहे. तसेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की सायबर सुरक्षा विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली असून अधिक चौकशी सुरु आहे.
तसेच शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की वेबसाईट हॅक झाली आहे. मात्र, कोणतीही माहिती लीक झाल्याच्या संदर्भात अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र, खबरदारी म्हणून याबाबत सर्व चौकशी केली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
पहलगाम हल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भारताने २३ एप्रिल रोजी काही महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे.