भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानातून सुटका झाली, त्याचवेळी एका विवाहितेने गोंडस बाळाला जन्म दिला.  राजस्थानातील अल्वर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी जन्माला आलेल्या बालकाचे नाव पाकिस्तानातून सुखरुप परतलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या नावावरुन ‘अभिनंदन’ असे ठेवण्यात आले आहे.

बाळाचे आजोबा जनेश भुतानी यांनी सांगितले की, माझ्या सुनेला शुक्रवारी संध्याकाळी पुत्ररत्न प्राप्त झाले, त्याच वेळी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळे मुलाचे नाव आम्ही अभिनंदन असे ठेवले आहे. यावेळी सुनेसह सर्वच जण दूरचित्रवाणीवर विंग कमांडर वर्धमान यांच्याविषयीच्या बातम्या बघत होते. नंतर सुनेला प्रसववेदना सुरू झाल्या.

बाळाची आई सपना देवी म्हणाल्या की, अभिनंदन या नावाद्वारे मी माझ्या बाळाला आपल्या शूर पायलटच्या पराक्रमाची आठवण देत राहील. माझा मुलगाही मोठा झाल्यावर अभिनंदन प्रमाणे शूरवीर सैनिक बनावा अशी माझी इच्छा असल्याचं त्या म्हणाल्या. हे कुटुंब अल्वरच्या किशनगड बास येथे वास्तव्यास आहे.

Story img Loader