Haribhau Bagde Statement on Gravity: सर आयझॅक न्यूटन एका झाडाखाली बसले होते, त्यांना सफरचंद खाली पडताना दिसलं आणि त्यातून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाचा शोध त्यांना लागला ही कथा सर्वपरिचित आहे. १६८७ साली सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. पण त्यांच्याही शेकडो वर्षं आधी वेदांमध्ये गुरुत्वाकर्षण बलाबाबत उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी केला आहे. बुधवारी जयपूरमधील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.
हरिभाऊ बागडे यांनी यावेळी बोलताना भारतीय ज्ञान परंपरेचा दाखला देताना अलिकडच्या काळात लागलेले अनेक शोध हे फार पूर्वी भारतात लागले होते, असा दावा केला. “ज्ञानाच्या परंपरेत भारत हा जगभरात कायम सर्वोत्तम राहिला आहे. भारतानं दशांश प्रणाली जगाला दिली. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाबाबत जगाला फार नंतर सांगितलं. भारतामध्ये तर फार पूर्वीच वेदांमध्ये त्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे”, असं हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले.
वीज, विमानाचा शोधही भारतातच!
दरम्यान, वीज, विमान या गोष्टींचा उल्लेख भारतात फार पूर्वी झाल्याचंही बागडे म्हणाले. “वीज, विमान यासारख्या अनेक शोधांचा उल्लेख भारतीय इतिहास ग्रंथांमध्ये आढळून येतो. ऋग्वेदातही याचे संदर्भ आढळतात. महर्षि भारद्वाज यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विमानांचा उल्लेख आढळतो. ५० वर्षांपूर्वी नासानं हे पुस्तक मिळावं अशी मागणी करणारं पत्रही लिहिलं होतं”, असं हरीभाऊ बागडे यांनी नमूद केलं.
ब्रिटिशांचं धोरण…
“भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय ज्ञानाला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच भारतीय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात सातत्याने भर घालत राहणं महत्त्वाचं ठरतं. शिवाय, हे ज्ञान भारतीय ज्ञान परंपरेशी जोडणंही महत्त्वाचं आहे”, असं हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नालंदा व तक्षशिला विद्यापीठांचाही उल्लेख केला.
“तुम्ही नालंदा व तक्षशिला विद्यापीठांबाबत ऐकलं असेल. ही दोन्ही विद्यापीठं इतकी समृद्ध होती की जगभरातले विद्यार्थी या विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी येत असत. त्या काळी या विद्यापीठांमध्ये फक्त संस्कृत भाषा होती, इतर कोणतीही भाषा वापरली जात नव्हती. बखतियार खिलजीनं नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केलं. पण आता नालंदा विद्यापीठ नव्याने उभं केलं जात आहे. ते पुन्हा पूर्वीसारखंच कार्यरत होईल”, असंही बागडे यांनी यावेळी नमूद केलं.
“भारतीय ज्ञानाला नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण यात कुणीही यशस्वी होऊ शकलेलं नाही. राजस्थान ही योद्ध्यांची भूमी आहे. बाप्पा रावल यांनी जवळपास शंभर वर्षं परकीय आक्रमकांना राजस्थानमध्ये पाऊल ठेऊ दिलं नाही”, असंही ते म्हणाले.