राजस्थान विधानसभेची निवडणूक भाजपाने जिंकल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स संपला आहे कारण भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. तर दुसरीकडे दीया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोघांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं आहे. छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशप्रमाणेच इथेही भाजपाने धक्कातंत्राचा वापर केला आहे. दीया कुमार या जयपूरच्या राज घराण्याशी संबंधित आहेत. जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून त्या जिंकल्या आहेत. याच जागेवरुन त्या खासदार झाल्या होत्या. महाराणी गायत्री देवी यांची त्या नात आहेत. गायत्री देवींप्रमाणेच त्यांनीही राजकारणात पाऊल ठेवलं आणि आता त्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत दीया कुमारी?

दीया कुमारी या राजघराण्याशी संबंधित आहेत. मुघल सम्राट अकबर याच्या दरबारात नवरत्नं होती. त्या नवरत्नांमध्ये होते मानसिंग. त्यांच्या घराण्याच्या त्या वंशज आहेत. एवढंच नाही तर जयपूरचं राजघराणं हे स्वतःला रामाचं वंशज असल्याचंही सांगत असतं. जयपूरचे महाराज भवानी सिंह यांनी आपण रामाचे पुत्र कुश यांचे आपण ३०९ वे वंशज असल्याचा दावाही केला होता. राज घराण्याच्या अनेक लोकांनी या गोष्टीला मान्यताही दिली आहे. दीया कुमारी यांनी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण दिल्लीत घेतलं आणि त्यानंतर त्या जयपूरमध्येही शिकल्या. उच्च शिक्षणासाठी त्या लंडनला गेल्या होत्या. १९९७ मध्ये नरेंद्र सिंह यांच्याशी कोर्टात लग्न केलं होतं.

कोण आहेत प्रेमचंद बैरवा ?

मौजमाबाद तालुक्यातील श्रीनिवासपुरा या ठिकाणी राहणारे प्रेमचंद बौरवा हे दलित कुटुंबातले आहेत. दलित कुटुंबात जन्मलेले प्रेमचंद बैरवा जयपूरच्या दूदू या मतदारसंघातून आमदार झाले आहेत. भाजपाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसचे प्रबळ नेते अशी ओळख असलेल्या बाबूलाल नागर यांना हरवलं. बैरवा यांनी नागर यांना ३५ हजारांहून अधिक मतांनी हरवलं.

१९९५ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून बैरवा यांनी राजकीय आयुष्याची सुरुवात केली होती. त्यांनी १९९५ मध्ये दूदू या ठिकाणाहून भरपूर काम केलं. बैरवा यांनी एमफिल केलं आहे तसंच त्यांनी पीएचडीही केलं आहे. भाजपाच्या एससी आघाडीचे ते प्रमुखही आहेत. तसंच पेट्रोल पंपाचे डीलरही आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे प्रेमचंद बैरवा यांच्याकडे ४.८३ कोटींची एकूण संपत्ती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan govt new deputy cm diya kumari prem chand bairwa bjp scj