स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या विरोधात बलात्कारप्रकरणी दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी येथील मध्यवर्ती कारागृहात घेण्याच्या अधिसूचनेला राजस्थान उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने यावर राज्य सरकारचा प्रतिसादही मागितला आहे.
बलात्कार प्रकरणाची सुनावणी आता १६ सप्टेंबरला सत्र न्यायालयातच होणार आहे. न्या. गोविंद माथूर यांनी तीन ऑगस्टच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली त्यावेळी त्यांनी राज्य सरकारला पुढील सुनावणीपर्यंत उत्तर देण्याचा आदेश दिला आहे.
रस्त्याने तुरुंगाच्या आवारापर्यंत जाताना समर्थकांनी नाटकी वातावरण तयार करू नये, असे न्यायालयाने आसाराम बापू यांना सुनावले.
आसाराम बापू यांचे वकील महेश बोरा यांनी सांगितले की, आसाराम बापू यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात जमू नये असे आवाहन वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सत्र न्यायालयाच्या आवारात धातुशोधक यंत्र लावण्यात यावे असे उच्च न्यायालयाने जोधपूरच्या पोलीस आयुक्तांना सांगितले आहे, तेथे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
प्रवेश करणाऱ्यांना पासेस जारी करावेत असेही सांगण्यात आले आहे. आसाराम यांना असलेला धोका व समर्थकांची नाटकबाजी यामुळे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी तुरुंगाच्या आवारात घेण्यास सांगितले होते. त्यानंतर तशी अधिसूचना काढण्यात आली होती.
त्या अधिसूचनेला आव्हान देताना असे सांगण्यात आले की, मुख्य न्यायाधीशांना अशा प्रकारचा प्रशासकीय आदेश काढण्याचा अधिकार नाही. विस्तृत पीठाने असा आदेश घटनात्मक तरतुदींच्या आधारे काढायला हरकत नसते. आसाराम बापू हे ऑगस्ट २०१३ पासून तुरुंगात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा