राजस्थानच्या झुंझुनू येथे मंगळवारी रात्री हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीमध्ये लिफ्टची साखळी तुटल्यामुळे लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये १४ जण रात्रभर खाणीत अडकून पडले. यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी रात्रीच बचावकार्य सुरू करण्यात आले होते. तब्बल ११ तास रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर १४ जणांना आज सकाळी सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षता पथक आणि हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी कोलिहान खाणीतून वरती येत असताना लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे १४ जण खोल खाणीत अडकले. खाणीत कोसळलेल्या लिफ्टमध्ये अडकलेल्या १४ जणांची रात्रभर केलेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर सुटका करण्यात आली. यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : दिल्लीतील शाळा, विमानतळ आणि रुग्णालयानंतर आता तिहार तुरुंगात बॉम्ब हल्ल्याची धमकी, तपास सुरू
अपघात कसा झाला?
पोलिसांच्या माहितीनुसार, हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी आणि एक दक्षता पक्षक खाणीतील कामाच्या पाहणीसाठी खाणीमध्ये गेले होते. यावेळी खाणीत तपासणी केल्यानंतर पुन्हा वरती येत असताना अचानक लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे ते १८०० फूट खोल खाणीत अडकून पडले होते. मात्र, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करत तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. खाणीत अडकलेल्या लोकांसाठी खाण्याचे पॅकेट, पाणी पाठवण्यात आले होते. औषधेही पाठवली होती.
याबरोबरच डॉक्टरांचं पक्षकही तेथे बोलावण्यात आलं होतं. खाणीत अकलेल्या १४ जणांना वाचवण्यासाठी तब्बल ११ तास रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर अखेर आज सकाळी आधी तीन जणांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर एक-एक अशा १४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी डॉक्टरांचे एक पथक आणि काही रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नाही.