राजस्थानमध्ये कॉंग्रेसची सत्ता उलथून टाकण्यात आणि मध्य प्रदेशात सत्तेची हॅटट्रिक करण्यात भारतीय जनता पक्ष रविवारी यशस्वी ठरला. राजस्थानमध्ये भाजपच्या नेत्या वसुंधराराजे शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने विधानसभा निवडणुकीत अभूतपू्र्व यश मिळवले. भाजपने राजस्थानमध्ये एकतृतीयांश बहुमत मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली असून, आतापर्यंतचा पक्षाचा हा सर्वांत मोठा विजय ठरणार आहे.
राजस्थानमधील पक्षाच्या विजयाचे श्रेय वसुंधराराजे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना दिले आहे. राजस्थानमधील नागरिकांनी आपल्यावर आणि पक्षावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभर घेतलेल्या मेहनतीमुळेच विजय साकारणे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.
मध्य प्रदेशात सलग तिसऱयांदा सत्ता मिळवण्यात भाजप यशस्वी ठरला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने आपल्या कामगिरीत गेल्यावेळेपेक्षा सुधारणा केली असून, तिथे भाजपची पुन्हा सत्ता येणार, हा ‘एक्झिट पोल्स’चा अंदाज खरा ठरला. चौहान यांनी सत्तेच्या हॅटट्रिकबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत. केंद्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनामुळेच पक्षाला सलग तिसऱयांदा विजय मिळवणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यशाचे श्रेय चौहान यांनी तेथील जनतेला अर्पण केले. मध्य प्रदेशातील जनतेच्या विश्वासाचाच हा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader