राजस्थानच्या करौली येथे लग्न मोडणं नवऱ्याच्या नातेवाईकांना भारी पडलं. साखरपुड्यासाठी मुलाकडचे नातेवाईक मुलीच्या घरी आले होते. यावेळी मुलानं होणाऱ्या नवरीला पाहिलं आणि तिला पाहताच साखरपुड्याला नकार दिला. भर साखरपुड्यात मुलानं मुलीला नकार दिल्यामुळं नवरीकडच्या लोकांच्या पायाखालची वाळूच सरकली. पाहता पाहता ही बातमी गावभर पसरली. त्यानंतर संतापलेल्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत लग्नास नकार देणाऱ्या नवऱ्यामुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केली. तसेच या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हायरल केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नवऱ्याकडच्या लोकांची तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी सांगितलं की, साखरपुड्यासाठी नवऱ्याकडचे लोक नवरीकडे आले होते. यावेळी नवऱ्या मुलानं मुलीला पाहिलं आणि लगेच साखरपुड्यासाठी नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की, फोटोत दिसत असलेली मुलगी प्रत्यक्षात तशी दिसत नाही. मुलानं म्हटलं की, ही तर फसवणूक आहे. मुलानं अचानक नकार दिल्यानंतर दोन्ही कुटुंबात वाद सुरू झाला. प्रकरण गावातील पंचासमोर केलं.
दोन्ही कुटुंबांत वाद सुरू असतानाच मुलाकडच्या लोकांनी लग्नही तोडलं. त्यानंतर गावातील लोकांनी मिळून मुलाकडील नातेवाईकांना मारहाण केली. तसेच नवऱ्याच्या भावाला पकडून त्याची मिशी आणि डोक्यावरचे केस भादरले. या घटनेचा काही लोकांनी व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावरही व्हायरल केला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, काही लोक घोळका करून उभे आहेत. मधोमध नवऱ्याच्या भावाला पकडून त्याचे केस भादरले जात आहेत. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गावकऱ्यांवरही टीका केली आहे.
अपमानजनक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवऱ्यामुलाने स्वतःची बाजू मांडणारा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला आहे. त्याचे म्हणणे होते की, आम्हाला चुकीचा फोटो दाखवून फसविण्यात आले. फोटोत दिसणारी मुलगी प्रत्यक्षात वेगळीच दिसत होती. जेव्हा आम्हाला फरक दिसला, तेव्हा आम्ही थेट लग्न मोडलं नाही तर विचार करण्यासाठी थोडा वेळ मागून घेतला. मात्र आम्हाला अतिशय मानहानीकारक वागणूक देण्यात आली. ज्याचा माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबणार आहोत.