राजस्थानचे नवनिर्वाचित आमदार व मंत्री हिरालाल नागर त्यांच्या कोटा जिल्ह्यात एका गावात भेटीसाठी गेले असता त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेलं स्टेज कोसळलं. यावेळी स्टेजवर स्वत: मंत्र्यांबरोबर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते. या दुर्घटनेत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत मंत्री हिरालाल नागर थोडक्यात बचावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

राजस्थानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हिरालाल नागर हे निवडून आले. कोटामधील संगोड मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर त्यांचा राजस्थानच्या मंत्रीमंडळातही समावेश करण्यात आला. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आपल्या मतदारसंघातील गावांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी स्थानिका कार्यकर्त्यांनी समारंभाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी रीतसर स्टेजही उभारण्यात आलं होतं.

मंत्री हिरालाल नागर स्टेजवर चढल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात हार घातला. पण पुढच्या काही क्षणांतच स्टेज खाली कोसळलं. स्टेजवरील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांबरोबर खुद्द मंत्रीही या दुर्घटनेत खाली कोसळले. यात त्यांच्यासमवेतचे चार कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री हिरालाल नागर यांना या दुर्घटनेत कोणतीही इजा झाली नाही.

का कोसळलं स्टेज?

दरम्यान, आता ही घटना का घडली? यावर तपास सुरू झाला असून स्टेजवर मर्यादेपेक्षा जास्त माणसं उभी राहिल्यामुळे स्टेज कोसळल्याचं सांगितलं जात आहे. मंत्री हिरालाल नागर व काही स्थानिक पदाधिकारी एवढ्याच लोकांसाठी हे स्टेज उभारण्यात आलं होतं. मात्र, नागर स्टेजवर आल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ त्यांचे अनेक कार्यकर्ते स्टेजवर चढले आणि स्टेज काही क्षणांत खाली कोसळलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan minister heeralal nagar stage collapsed video viral pmw
First published on: 05-01-2024 at 10:48 IST