राजस्थानातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट हा वाद आता राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे सरकला आहे. सोमवारपासून विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती. त्याला राज्यपालांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत सर्व आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले असून, काँग्रेसच्या आमदारांनी राजभवनातच निदर्शनं सुरू केली आहेत.

आणखी वाचा- “देशात याआधी असा ‘नंगा नाच’ कधी पाहिलेला नाही”, अशोक गेहलोत यांची टीका

सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना दिलेल्या अपात्रता नोटीसीवर राजस्थान उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे काँग्रेसचं लक्ष होतं. मात्र, उच्च न्यायालयानं नोटीसीवर स्थगिती आणल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बहुमत चाचणीसाठी पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्याचबरोबर फोनवरून संवाद साधत गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे सोमवारपासून अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा- “भाजपानं संविधानाची सर्कस केली, तर लोकशाहीला द्रौपदी”; काँग्रेसला संताप अनावर

“उद्या राज्यातील जनतेने राजभवनाला घेराव घातला, तर आमची जबाबदारी नाही,” असा इशाराही गेहलोत यांनी दिला होता. काँग्रेसच्या मागणीनंतर राज्यपालांनी अधिवेशन बोलण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी राजभवनातच निदर्शनं सुरू केली आहेत. बहुमत चाचणी घेण्यासाठी सोमवारपासून अधिवेशन बोलवावं अशी मागणी आमदारांनी केली आहे.

आणखी वाचा- “…तर मी पायलट यांचे स्वागत करेन”; अशोक गहलोत यांची ‘ऑफर’

आणखी वाचा- राजस्थान सत्ता संघर्ष; सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

“हे सगळं भाजपाचं षडयंत्र…”

पत्रकार परिषदेत बोलताना गेहलोत म्हणाले होते, “आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे असं वारंवार सांगत आहोत. चिंता आम्हाला असली पाहिजे, पण तेच चिंतेत आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना बंधक ठेवण्यात आलं आहे. त्यांनाही कदाचित तेथून सुटका करुन घ्यायची असेल. तिथे पोलीस, बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. फोन काढून घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारला याची काळजी नाही का ? हे सगळं भाजपाचं षडयंत्र आहे,” असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.