देशाच्या राजकारणात सध्या ‘लाल डायरी’चा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा त्यात उल्लेख असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. या डायरीवरून राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांना लक्ष्य केलं जात असताना त्यावरून मोदींनी आज राजस्थान दौऱ्यादरम्यानही गेहलोत यांच्यावर टीका केली. यावरून आता अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अशोक गेहलोत यांच्यावर टीकास्र
अवघ्या तीन महिन्यांवर राजस्थानच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राजस्थानमधील काही विकासकामांचं उद्घाटन केलं. यानंतर राजस्थानच्या सिकरमधील सभेत बोलताना मोदींनी अशोक गेहलोत यांच्यावर टीकास्र सोडलं.
“काँग्रेस म्हणजे लूट की दुकान, झूठ का बाजार. या लूट की दुकानचंच उत्पादन म्हणजे लाल डायरी आहे”, असा टोला मोदींनी अशोक गेहलोत यांना लगावला. “राजस्थान काँग्रेसमध्ये अनेक बडे नेतेही लाल डायरीचा उल्लेख करताच मौन होत आहेत. हे लोक अशा नेत्यांच्या तोंडाला कुलूप लावू शकतात. पण या निवडणुकांमध्ये राजस्थानमधील जनता संपूर्ण काँग्रेसचा डब्बा गोल करणार आहे”, असंही मोदी यावेळी म्हणाले.
अशोक गेहलोत यांचं प्रत्युत्तर!
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला अशोक गेहलोत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पंतप्रधानांनी सिकरमध्ये बोलताना भाषण दिलं. एका लाल डायरीवर ते बोलले. पंतप्रधानपदाचं एक महत्त्व आहे. त्यांच्याकडे इन्कम टॅक्स आहे, ईडी आहे, सीबीआय आहे. याचा दुरुपयोग त्यांच्याकडून होत आहे. त्यांना या डायरीविषयी माहिती काढता येत नाही का? हे डायरी प्रकरण त्यांनी जाणून बुजून काढलं आहे”, असं अशोक गेहलोत माध्यमांना म्हणाले.
“विधिमंडळात ५० डायऱ्या आणल्या गेल्या. मी तर ऐकलं की संसदेतही डायऱ्या लावल्या गेल्या. मोदींचा पक्ष एवढा घाबरलाय की ते वारंवार इथे येतायत? तसं तर राजकारणात त्यांनी यावं. मग ते राजनाथ सिंह असो किंवा अमित शाह असोत. पण राजस्थानवर टीका गेली की महिलांवर अत्याचार हो आहेत, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, भ्रष्टाचार होतोय वगैरे. एसीबीचे सर्वाधिक छापे राजस्थानमध्ये पडले आहेत. त्यानंतरही हे लोक राजस्थानला लक्ष्य करत आहेत. तीन महिन्यांत निवडणुका होणार आहेत. पण जनतेतलं वातावरण पाहून हे इतके घाबरले आहेत की देशाचे पंतप्रधान लाल डायऱ्या दाखवून काहीही आरोप लावत आहेत”, अशा शब्दांत अशोक गेहलोत यांनी मोदींना लक्ष्य केलं.
“मी ऐकलंय की लाल डायरीत काँग्रेसचे काळे कारनामे….”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बोचरी टीका
कार्यक्रमातील भाषणावरून वाद
दरम्यान, आज सकाळपासूनच मोदींच्या कार्यक्रमातून अशोक गेहलोत यांचं भाषण काढल्याच्या मुद्द्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे चालू होते. आधी अशोक गेहलोत यांनी ट्वीट करून आपलं भाषण कार्यक्रम पत्रिकेतून हटवल्याचा दावा केला. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने असं काहीही नसून आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, असं ट्वीट केलं. त्यावर पुन्हा अशोक गेहलोत यांनी कार्यक्रम नियोजन पत्रिकेचे फोटो शेअर करत त्यातून आधी असणारं त्यांचं तीन मिनिटांचं भाषण नंतर काढल्याचा दावा केला आहे.