स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चौकशीची व्याप्ती दिल्ली पोलिसांनी बुधवारी आणखी वाढवली. राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा यांची पोलिसांनी बुधवारी तब्बल १२ तास चौकशी केली. या चौकशीनंतर कुंद्रा यांचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला असून, त्यांना गुरुवारीही चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे.
स्पॉट फिक्सिंगवरून दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचे तीन क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अगोदरच अटक केली आहे. आयपीएलमध्ये राज कुंद्रा यांनी कशा पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केली आणि अटक करण्यात आलेल्या तिन्ही खेळाडूंची वर्तणूक कशी होती, हे जाणून घेण्यासाठी राज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने सांगितले होते. मात्र, कुंद्रा यांचे सट्टेबाजांशी काही संबंध होते का, याचीही चौकशी त्यांच्याकडे करण्यात आली असल्याचे समजते. बुधवारी सकाळी नऊ वाजता राज कुंद्रा लोधी कॉलनीतील दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागात आले होते. रात्री सव्वा नऊच्या सुमारास ते तिथून बाहेर पडले. राज कुंद्रा यांची गुरुवारीही चौकशी करण्यात येणार असून, त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पुढील कारवाईची दिशा ठरविणार आहेत.
बुधवारी चौकशी संपल्यानंतर राज कुंद्रा यांनी ट्विटरवर म्हटले आहे, आजचा दिवस खूप थकवणारा होता. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांचे उपायुक्त संजीव यादव, सहायक आयुक्त मनिषी चंद्रा, श्रीवास्तव, ओबेरॉय यांनी सखोल तपास केल्याबद्दल त्यांचे आभार. क्रिकेटमधील गैरप्रकार दूर करणारे हे अधिकारी हिरो आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा