काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये एका महाविद्यालयात मुलींच्या हिजाब परिधान करण्यावरून वाद निर्माण झाला होता. तत्कालीन कर्नाटक सरकारने शाळा-महाविद्यालयांमद्ये हिजाबवर बंदी घातली. उच्च न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकप्रमाणेच राजस्थानमध्येही हिजाबच्या मुद्द्यावरून वाद वाढण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये हवा महल मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा आमदार बालमुकुंद आचार्य यांचा एका शाळेतला व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून शाळेत हिजाब घातलेल्या काही मुली दिसल्यानंत त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला.
नेमकं घडलं काय?
आमदार बालमुकुंद आचार्य यांनी सोमवारी सकाळी जयपूरच्या गंगापोल परिसरातील सरकारी शाळेला भेट दिली. यावेळी काही मुस्लीम मुलींनी हिजाब घातल्याचं त्यांना दिसून आलं. त्यामुळे बालमुकुंद आचार्य यांनी या गोष्टीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. मुलींना हिजाब वापरण्यावर बंदी घाला अशा सूचना त्यांनी शाळा व्यवस्थापनाला केल्या. यावेळी शाळा प्रशासनातील पदाधिकारी आमदार आचार्यांना स्पष्टीकरण देत असल्याचंही व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या प्रकारानंतर काही हिंदू व मुस्लीम विद्यार्थ्यांनी दोन स्वतंत्र तक्रारी पोलिसांत दाखल केल्या आहेत. यांदर्भात जयपूर उत्तरच्या पोलीस उपायुक्त राशी डोगरा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार दोन्ही गटांनी अशा तक्रारी केल्या आहेत की त्यांना शाळेत त्यांच्या धार्मिक रीतींचं पालन करू दिलं जात नाही. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री किरोडीलाल मीणा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं.
बालमुकुंद आचार्यांचं नेमकं म्हणणं काय?
दरम्यान, या प्रकारानंतर काही मुस्लीम मुलींनी आंदोलन केल्यानंतर आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एएनआयशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “काही राजाकरण करणाऱ्या लोकांनी हे वातावरण तयार केलं आहे. तिथे मुलींशी आम्ही खूप चांगला संवाद साधला. त्या मुलींनी त्यांच्या काही मागण्यांचं पत्र मला दिलं आहे. त्यामुळे नाराजी वगैरे असं काही नाहीये. काही राजकीय लोकांकडे काही मुद्दा नाहीये. त्यामुळे काही मुलींना पुढे करून त्यांनी असं वातावरण तयार केलं आहे. आंदोलन करणाऱ्या मुली त्या शाळेच्या आहेत की नाही हेही माहिती नाही”, असं बालमुकुंद आचार्य म्हणाले.
“मी तिथल्या प्रशासनाला सांगितलंय की या मुलांना समजावण्याचा प्रयत्न करा. शाळेच्या नियमांचं पालन व्हायला हवं. सामाजिक जीवनात त्यांनी धर्मानुसार आचरण करावं. पण शाळेत तरी किमान सगळे समान असायला हवेत. मग शाळेचा गणवेश ठेवलाच कशाला? मग पोलिसांत, लष्करातही असंच करायला हवं. प्रत्येकाचा आपापला धर्म आहे. पण शाळेत तिथल्या नियमांचं पालन व्हायला हवं. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन करू की सगळ्या शाळांमध्ये गणवेश सक्ती करावी. मदरशांच्या वेशात मदरशांमध्ये जावं”, अशी भूमिका यावेळी आमदार बालमुकुंद आचार्य यांनी मांडली.