Rajasthan Woman Murder: राजस्थानच्या जोधपूर येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या ५० वर्षीय ब्युटिशियन महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. एका प्लास्टिक पिशवीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. सदर महिलेच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने आपल्या घराशेजारीच महिलेचा मृतदेह पुरला होता. दिवाळीच्या दिवसात मृत महिलेच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तसेच संशयित आरोपी गुल मोहम्मद यानेच हा खून केला असल्याचे आरोपीच्या पत्नीने सांगितले असून पोलीस गुल मोहम्मद नावाच्या आरोपीचा शोध घेत आहेत.

२८ ऑक्टोबर रोजी मृत महिला अनिता चौधरी बेपत्ता झाली होती. तिच्या ब्युटी पार्लर जवळून दुपारच्या दरम्यान ती हरवली. संध्याकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे दुसऱ्या दिवशी तिचा पती मनमोहन चौधरीने जोधपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत गुलामुद्दीन उर्फ गुल मोहम्मदवर पोलिसांना संशय आला. अनिता चौधरी यांचे ब्युटी पार्लर असलेल्या इमारतीमध्येच गुलचेही दुकान आहे. दोघेही एकमेकांना ओळखत होते. पीडित महिलेच्या कॉल डिटेल्समधूनच पोलिसांना गुल मोहम्मदवर संशय आला होता.

हे वाचा >> जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे नजीब मुल्लांसमोर आव्हान

सरदारपुरा पोलीस ठाण्यातील अधिकारी दिलीप सिंह राठोड यांनी सांगितले की, बेपत्ता होण्यापूर्वी अनिताने दुकानाबाहेरून रिक्षा पकडली होती. पोलिसांनी सदर रिक्षावाल्याचा शोध घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की, पीडित महिलेला आरोपीच्या घराजवळ सोडले होते. पोलिसांनी जेव्हा आरोपी गुल मोहम्मदचे घर गाठले, तेव्हा गुल मोहम्मदची पत्नी घरी होती. तिने सांगितले की, ती तीन दिवस तिच्या बहिणीच्या घरी गेली होती.

बहिणीच्या घरून परतल्यानंतर मोहम्मदने तिला अनिताबद्दल सांगितले. तिला मारून तिचा मृतदेह प्लास्टिक पिशव्यात घराच्या मागे पुरला आहे. पोलिसांनी बुलडोझर बोलावून घराच्या मागे १२ फुटांचा खड्डा खणल्यानंतर त्यांना छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

मृत महिला अनिताच्या मुलाने सांगितले की, मोहम्मदने त्याच्या आईची फसवणूक करून तिचा खून केला. पीडित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी जोधपूरमध्ये ठिकठिकाणी छापा टाकून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Story img Loader