Rajasthan dowry Case Woman Suicide : राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यातील हदां पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील महिलेने सासू-सासऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सासरकडील मंडळींनी हुंड्यासाठी केलेला छळ व त्यामुळे तणावात असलेल्या महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. दुर्गा कंवर असं या मृत महिलेचं नाव असून तिने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून तिचं दुःख व्यक्त केलं होतं. यामध्ये तिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. दुर्गा कंवरने तिच्या स्टेटसवर म्हटलं आहे की “माझे सासरे आणि नंदेने दिलेल्या त्रासामुळे मी खूप दुःखी आहे. म्हणून मी जीव देत आहे. मिस यू आई, मिस यू बाबा, माझ्या सासूबाईंना हातात बेड्या घालून घ्यायची खूप हौस आहे. तुम्ही ती पूर्ण केलीच पाहिजे”.
दुर्गा कंवरचं व्हॉट्सअॅप स्टेटस पाहिल्यानंतर तिच्या नातेवाईकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. सर्वांनी तिला फोन करण्याचा, तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाचाही तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर थेट दुर्गाच्या आत्महत्येचं वृत्त समोर आलं. दरम्यान, दुर्गाचे वडील देवी सिंह यांनी हदां पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. देवी सिंह म्हणाले, माझ्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं. देवी सिंह यांची कन्या दुर्गा हिचं २०२१ मध्ये दिलीप सिंह यांच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर दुर्गाला तिच्या सासरकडील मंडळींकडून खूप त्रास होत होता. सासरे छैली सिंह, सासू कमा कंवर, नणंद सोनी कंवर यांनी तिच्या मागे हुंड्यासाठी तगादा लावला होता. हुंड्यासाठी हे तिघेही तिचा छळ करत होते, असा आरोप देवी सिंह यांनी केला आहे.
“सासरकडील मंडळी दुर्गाचा मानसिक व शारीरिक छळ करत होती”, मृत महिलेच्या भावाचा आरोप
मृत दुर्गाचे भाऊ सांगू सिंह यांनी सांगितलं की त्यांच्या बहिणीचा तिच्या सासरी मानसिक व शारीरिक छळ होत होता, त्यामुळेच तिने जीव दिला. दुर्गाने आत्महत्येच्या काही वेळ आधी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून त्याद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. दरम्यान, देवी सिंह यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे.