गोल्डमन सॅच या कंपनीचे संचालक आणि मूळचे भारतीय वंशाचे असलेले रजत गुप्ता यांच्यावर ‘इन्सायडर ट्रेडिंग’प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. फिर्यादींकडून या प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ‘वायर टेप्स’ पुराव्यांचे सादरीकरण कनिष्ठ न्यायालयासमोर करणे ‘योग्य’ नव्हते, असा आक्षेप गुप्ता यांच्या वकिलाने नोंदविला आहे.
गुप्ता यांचे अॅटर्नी सेठ व्ॉक्समन यांनी अमेरिकेच्या न्यू यॉर्क येथील अपिलीय न्यायालयात या प्रकरणाबाबत युक्तिवाद केला. गुप्ता ‘इन्सायडर ट्रेनिंग’ प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या ‘वायर टेप्स’ हा ऐकीव पुरावा असल्याने तो ग्राह्य़ कसा धरता येईल असा सवाल त्यांनी केला.
न्यायालयातील युक्तिवाद
या पुराव्यात ध्वनिमुद्रित असलेली संभाषणे ही हेज फंड कंपनीचे कर्मचारी आणि या प्रकरणात दोषी ठरलेले गॅलिऑन ग्रुपचे व्यवस्थापक राज राजरत्नम यांच्यातील आहेत. त्यांमध्ये रजत गुप्ता यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही, असे बचाव पक्षातर्फे सांगण्यात आले आणि म्हणूनच त्या संभाषणांमध्ये कोणकोणते दावे करण्यात आले आहेत. याला काहीच अर्थ उरत नाही, उलट असे ध्वनिमुद्रण पुरावे म्हणून कसे काय ग्राह्य़ धरण्यात आले, असा सवालही सेठ व्ॉक्समन यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला.
एकूणच हे संपूर्ण प्रकरण केवळ ऐकीव आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तयार करण्यात आले आहे, आणि गंमत म्हणजे यापैकी एकाही पुराव्यात गुप्ता यांचा प्रत्यक्ष संबंध आढळलेला नाही. विशेष म्हणजे याच पुराव्यांद्वारे गुप्ता यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या अशिलावर करण्यात आलेले आरोप अन्याय्य आहेत, असा युक्तिवाद व्ॉक्समन यांनी केला.
काय आहे गुप्ता प्रकरण?
रजत गुप्ता (वय -६४) हे मूळचे भारतीय वंशाचे उद्योजक असून ते मॅकिन्सी अँड कंपनीचे माजी अध्यक्ष होते. त्याबरोबरच गोल्डमन सॅच आणि प्रॉक्टर अँड गँबल या कंपन्यांच्या संचालक मंडळांवरही ते होते. गोल्डमन सॅच कंपनीची गोपनीय माहिती आपले व्यावसायिक सहकारी असलेल्या राज राजरत्नम यांना पुरविल्याचा आरोप गुप्ता यांच्यावर होता. त्यासाठी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना २ वर्षे कारावासाची तसेच ५० लाख डॉलर आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, तर राजरत्नम यांना ११ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.