ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आणि स्थानिक भारतीय नागरिकांमध्ये रविवारी न्यूयॉर्कमध्ये धक्काबुक्की झाली. मोदींच्या अमेरिका दौ-याबाबत वृत्तांकन करताना ही घटना घडली. अमेरिकेतील ‘मॅडिसन स्क्वेअर’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या काही वेळ अगोदर हा प्रकार घडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारानंतर सोशल नेटवर्कींग साइट्सवर मोठ्या प्रमाणात या घटनेचा निषेध करण्यात आला. ‘मोदी यांच्यावर सतत टीका करण्याच्या भूमिकेमुळे मोदी समर्थकांनी सरदेसाई यांना धक्काबुक्की केल्याचे @JFK_Amerika यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, सरदेसाई यांनी आपल्या खासगी टि्वटर अकाऊंटवर झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘मॅडिसन स्क्वेअर’मध्ये अतिशय उत्साहवर्धक वातावरण आणि मोठा लोकसमुदाय आहे. परंतु यामध्ये काही मूर्ख लोक आहेत, जे आपले मत पटवून देण्यासाठी गैरवर्तन हाच योग्य मार्ग असल्याचे मानतात. आम्ही या सर्वांना कॅमेराबद्ध केल्याचा आम्हाला आनंद आहे.’ राजदीप सरदेसाई आणि स्थानिक भारतीय नागरिकांमध्ये धक्काबुक्की होत असलेला व्हिडिओही काही वेळातच यूट्युबवर अपलोड झाल्यानंतर टि्वटर आणि फेसबुकवरही तो चर्चेचा विषय आहे. टि्वटरवर #IStandWithRajdeep आणि #RajdeepSlapped हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. दरम्यान, सरदेसाईंना धक्काबुक्की झाल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. तिकडे काँग्रेस नेते अजय माकन यांनी या घटनेचा निषेध नोंदवताना, मुक्त पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना न्यूयॉर्कमध्ये धक्काबुक्की
ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आणि स्थानिक भारतीय नागरिकांमध्ये रविवारी न्यूयॉर्कमध्ये धक्काबुक्की झाली. मोदींच्या अमेरिका दौ-याबाबत वृत्तांकन करताना ही घटना घडली.

First published on: 29-09-2014 at 11:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajdeep sardesai roughed up