Rajeev Shukla With Coldplay Chris Martin : जगप्रसिद्ध कोल्ड प्ले बँडचा सध्या भारत दौरा सुरू आहे. २२ जानेवारी रोजी मुंबई सचिन तेंडुलकरने आयोजित केलेल्या एका खासगी कार्यक्रमात कोल्ड प्लेचा गायक ख्रिस मार्टिननेही हजेरी लावली होती. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लाही उपस्थित होते.
दरम्यान राजीव शुक्ला यांनी या कार्यक्रमातील फोटो एक्सवर शेअर केले आहेत. शुक्ला यांच्या या पोस्टनंतर एक्सवर मीम्सचा पूर आला असून, युजर्सनी राजीव शुक्ला काँग्रेस, भाजपासह सर्वत्र कसे काय असतात या आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.
सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने, एक कार्यक्रम आयोजित केला होता. आता सोशल मीडियावर या कार्यक्रमातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सचिनने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील एक फोटो राजीव शुक्ला यांनी नुकताच एक्सवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ख्रिस मार्टिनबरोबर त्याचे वडील, सचिन तेंडुलकर, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राजीव शुक्ला दिसत आहेत. यावेळी शुल्का यांनी फोटो पोस्ट करताना, “ख्रिस मार्टिन आणि त्याचे वडील मैत्रीपूर्ण व्यक्ती आहेत. ख्रिसचा भारत दौरा अत्यंत यशस्वी झाला आहे”, असे लिहिले आहे.
राजीव शुक्ला यांनी ख्रिस मार्टिनबरोबरचा फोटो शेअर केल्यानंतर अनेक एक्स युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. यावेळी एक युजर म्हणाला, “हा व्यक्ती प्रत्येक कार्यक्रमात कसा असतो? मग तो भाजपाचा असो वा काँग्रेसचा, ते नेहमीच तिथे असतात!” यावेळी आणखी एक युजर म्हणाला, “ऋतू येतो आणि जातो, सरकारे येतात आणि जातात, वेदना आणि दुःख येतात आणि जातात, अरेरे, अगदी ‘कितने गाजी आये और गये’, शुक्लाजी हेच एकमेव व्यक्ती आहेत जे स्थिर आहेत.”
राजीव शुक्ला यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर एका युजरने त्यांना क्लासेस सुरू करण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, “सर, तुम्ही सोशल नेटवर्किंग आणि कन्व्हिनिंग स्किल्सचे क्लासेस चालू करा अब्जावधी रुपये कमावचाल. तुम्ही एकाच वेळी इतक्या सर्व गोष्टी कशा करू शकता, सगळे तुमच्याकडून शिकू इच्छितात, किमान मला तरी शिकायचे आहे.”