सुपरस्टार रजनीकांत, टेनिसपटू सानिया मिर्झा, अमेरिकेचे माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा, प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील ५६ मान्यवरांना मंगळवारी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही. के. अत्रे, तेलुगू दैनिक इनाडूचे मुख्य संपादक रामोजी राव, शिक्षणतज्ज्ञ इंदू जैन, गायक उदित नारायण, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनाही राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
रजनीकांत, अत्रे, राव, गिरिजा देवी, व्ही. शांता यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर भार्गव, जैन, ब्लॅकविल, मिर्झा, नारायण, हेसनम कन्हैलाल, वाय. एल. प्रसाद, दयानंद सरस्वती (मरणोत्तर), राम सुतार, एन. एस. रामानुज, स्वामी तेजोमयानंद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रियंका चोप्रा, धीरेंद्रनाथ बेझबारूआ, एस. एल. भैरप्पा, मेडलीन हर्मन डी ब्लिक, कामेश्वर ब्रह्मा यांच्यासह ४० जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध दाक्षिणात्य कलावंत तसेच बॉलिवूड जगतातही प्रभावी ठसा उमटविणारे रजनीकांत यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रजनीकांत पत्नी लता रजनीकांत यांच्यासह उपस्थित होते. यावेळी सानिया मिर्झा हिला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर, बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्राला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेता अजय देवगण, अनुपम खेर आणि चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांना २८ मार्च रोजी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.