कावेरी खोऱ्यातील पाण्याच्या वाटपावरून आता तामिळनाडू चित्रपटसृष्टी एकवटली आहे. कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ स्थापनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन, संगीत दिग्दर्शक इलाई राजा, धनुष, सूर्या यांच्यासह कलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
यावेळी चेन्नईत होणाऱ्या आयपीएल (IPL) सामन्यांवरून रजनीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात कावेरी पाणी वाटपावरून संघर्ष सुरू असताना चेन्नईमध्ये आयपीएलचे (IPL) सामने होणे लज्जास्पद आहे, असे त्यांनी म्हटले. त्याचसोबत चेन्नई सुपरकिंग्जच्या (CSK) खेळाडूंनी आणि चाहत्यांनीही सामनादरम्यान काळ्या पट्ट्या बांधून निषेध करावा असे आवाहन त्यांनी केले.
Chennai: Rajinikanth, Kamal Hassan and Dhanush take part in protest over demand for formation of #CauveryMangementBoard pic.twitter.com/HCY7RTiGLv
— ANI (@ANI) April 8, 2018
‘साऊथ इंडिया आर्टिस्ट असोसिएश’ने एक दिवसाचे आंदोलन पुकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राजकीय पक्षांनीदेखील मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. आज सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनात मोठमोठ्या कलाकारांनी तसेच चित्रपटसृष्टीतील मंडळींनी हजेरी लावली.
काय आहे वाद?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कावेरी पाणीवाटप प्रश्नावर निकाल दिला होता. कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच, कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात केली होती. या पाण्याचे वाटप करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापण्याचे आदेश दिले होते. पण हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आत्तापर्यंत केंद्राकडून कोणतेही व्यवस्थापन मंडळ नेमण्यात आलेले नाही. त्याचमुळे कावेरीचे पाणी पेटले असून गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत या विरोधात निदर्शने होत आहेत.