माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी रविचंद्रनची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली. “उत्तर भारतातील लोकांनी आमच्याकडे दहशतवादी किंवा मारेकरी म्हणून पाहू नये, तर पीडित म्हणून पाहावे” असे आवाहन सुटकेनंतर रविचंद्रनने केले आहे. “वेळ आणि सत्ता कोण दहशतवादी आहे आणि कोण स्वातंत्र्यसैनिक हे ठरवत असते. दहशतवादी असल्याचा दोष जरी सहन केला असला, तरी वेळ आपल्याला निर्दोष ठरवेल”, असे रविचंद्रनने म्हटले आहे.
राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सामील नव्हतो, असेही रविचंद्रनने ‘एएनआय’ या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले आहे. “तमिळ अभिमानापोटी आणि तमिळ चळवळीसाठी आम्ही काही गोष्टी केल्या आहेत. मात्र, आम्ही राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सामील नव्हतो. फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेयोग्य आम्ही काहीही चुकीचे केले नाही”, असे रविचंद्रनने स्पष्ट केले आहे. मदुराई केंद्रीय कारागृहात अनेक दशकांपासून रविचंद्रन शिक्षा भोगत होता.
राजीव गांधींची मारेकरी नलिनीने तुरुंगातून सुटताच तामिळनाडू जनेतेचे मानले आभार; म्हणाली…
‘एलटीटीई’च्या भारत आणि श्रीलंकेतील प्रशिक्षण शिबिरात रविचंद्रन सहभागी होता. त्याने ‘एलटीटीई’ नेते किट्टू आणि बॅबी सुब्रमण्यमची भेट घेतली होती. हत्येतील अन्य दोषी सिवारासनला मदत करण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते. हत्येनंतर सिवारासन आणि इतरांना आश्रय देण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे कामही त्याच्यावर सोपवण्यात आले होते.
राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सर्व सहा दोषींची सर्वोच्च न्यायालयाने मुक्तता केली आहे. यामध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायास, जयकुमार या दोषींचा समावेश आहे. याआधी राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवालन याची १८ मे रोजी सुटका करण्यात होती. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे LTTE संघटनेने आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या केली होती.