माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन सह सर्व सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश आज (११ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन यांच्यासह संथन, मुरुगन, रॉबर्ट पायास, जयकुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सातवा दोषी एजी पेरारिवालन याची याआधीच सुटका करण्यात आलेली आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामधील नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याआधी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवालन याची १८ मे रोजी सुटका करण्यात होती. पेरारिवालन याने राजीव गांधींच्या हत्याप्रकरणात ३० वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्याने संविधानातील कलम १४२ चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती. दोषी नलिनीने पेरारिवालनच्या बाबतीत घेण्यात आलेल्या याच निर्णयाचा दाखला देत माझीही सुटका करावी अशी मागणी केली होती.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची LTTE संघटनेने तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे आत्मघाती बॉम्बहल्ल्याच्या मदतीने २१ मे १९९१ रोजी हत्या केली होती.

Story img Loader