माजी पंतप्रधान राजीव गांधी हे स्वीडनमधील एका कंपनीसाठी एजंट म्हणून काम करीत असल्याची माहिती ‘विकिलीक्स’ने नव्याने प्रसिद्ध केलेल्या अमेरिकी दूतावासाच्या काही केबल्सच्या माध्यमातून पुढे आलीये. स्वीडनमधील साब स्कानिया कंपनीसाठी राजीव गांधी एजंट म्हणून काम करीत असल्याचे या केबल्समध्ये म्हटले आहे. ‘द हिंदू’ने यासंदर्भातील सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.
इंडियन एअरफोर्ससाठी लढाऊ विमाने विकण्याचा प्रयत्न साब स्कानिया या कंपनीने केल्याची माहिती देण्यात आली आहे. याच कंपनीसाठी राजीव गांधी एजंट म्हणून काम करीत होते, असे या केबल्समध्ये म्हटले आहे. १९७४ ते १९७६ या वर्षांमधील ४१ केबल्स विकिलीक्सने उघड केल्या आहेत. त्यापैकी २१ ऑक्टोबर १९७५च्या एका केबलमध्ये राजीव गांधी या स्वीडिश कंपनीसाठी एजंट म्हणून काम करीत असल्याची माहिती देण्यात आलीये.
हा आरोप करण्यात आलेल्या काळात राजीव गांधी हे केंद्र सरकारमध्ये नव्हते. त्यांची आई इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान होत्या. राजीव गांधी त्यावेळी इंडियन एअरलाईन्समध्ये काम करीत होते.
दरम्यान, उघड करण्यात आलेल्या केबल्समध्येच लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेत राजीव गांधी यांची एजंट म्हणून असलेल्या भूमिकेबद्दल कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे. त्यावेळी लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेतून साब स्कानिया या स्वीडनमधील कंपनीने नंतर माघार घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा