देशातील क्रीडा क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला असून मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका करतानाच अहमदाबाद स्टेडियमच्या नामकरणाचा मुद्दा पुढे केला आहे. “खेळाडूंच्या सन्मानामध्ये देखील राजकीय डावपेच का?” असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम यांचं ट्वीट

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या मुद्द्यावर ट्वीट करत आक्षेप घेतला आहे. “प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जनतेची अशी मोठी मागणी आहे की अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेलं तुमचं नाव हटवून एखाद्या खेळाडूचं नाव तिथे दिलं जावं. खेळाडूंच्या सन्मानामध्ये देखील राजकीय डावपेच का?”, असं आपल्या ट्वीटमध्ये निरुपम म्हणाले आहेत. “हा निर्णय चुकीचा असून माझा त्याला विरोध आहे”, असं देखील निरुपम म्हणाले आहेत.

 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्याची विनंती देशभरातून येत होती. नागरिकांच्या या विनंतीनंतर हे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसकडून आक्षेप घेतला जात आहे.

 

“देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे” असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader