माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सहा दोषींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. त्यापैकी एक असेलेल्या नलिनी श्रीहरन हिची तुरुंगात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी तिची भेट घेतली होती. दरम्यान, बाहेर येताच नलिनी श्रीहरनने या भेटीबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा – राजीव गांधींची मारेकरी नलिनीने तुरुंगातून सुटताच तामिळनाडू जनेतेचे मानले आभार; म्हणाली…
हिंदुस्तान टाईम्सने एएनआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नलिनी श्रीहरनने आज (रविवारी) काही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना तिने प्रियंका गांधींच्या भेटीबाबतही खुसाला केला. “प्रियांका गांधी वाड्रा मला तुरुंगात भेटल्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मला राजीव गांधीच्या हत्येबाबत विचारणा केली होती. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या आणि रडायला लागल्या”, अशी माहिती नलिनी श्रीहरनने दिली.
दरम्यान, यावेळी बोलताना तिने तिच्या पतीचीही सुटका करावी, त्यांसदर्भातील खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी तामिळनाडू सरकारकडे करणार असल्याचे सांगितले. तसेच सोमवारी त्रिची येथील विशेष शिबिरात जाऊन पतीची भेट घेणार असल्याचेही ती म्हणाली.
हेही वाचा – गुजरातमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोदी स्टेडियमच्या नामांतराचे आश्वासन
दरम्यान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या पेरारिवलन, नलिनी श्रीहरन, आर. पी रविचंद्रन, जयकुमार, सुतेंथीराजा संथन, मुरुगन आणि रॉबर्ट पायस या सहा दोषींच्या सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. “पेरारिवलनच्या सुटकेचे निर्देश देताना न्यायालयाने जे निकष आणि बाबी विचारात घेतल्या होत्या, त्या सध्याच्या याचिकाकर्त्यांनाही लागू होत असल्याचे आम्हाला आढळले. त्यामुळे या याचिकाकर्त्यांनी संबंधित गुन्ह्यासाठी पुरेशी शिक्षा आतापर्यंत भोगली आहे. जर हे याचिकाकर्ते या गुन्ह्याशिवाय इतर कोणत्याही प्रकरणात शिक्षा भोगत नसतील, तर त्यांची तात्काळ मुक्तता करावी”, असे खंडपीठाने निकालात नमूद केले होते. तसेच “या दोषींनी २३ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगला आहे. त्यांची तुरुंगातील वागणूक समाधानकारक होती, त्यांनी पदवी संपादन केली आहे, पुस्तकेही लिहिली आहेत आणि समाजसेवेतही सहभाग घेतला”, असे निरीक्षणही न्यायालयाने आदेशात नोंदवले होते.