सनसनाटी बातम्या प्रसृत करून जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या विकिलिक्सने केलेल्या ताज्या दाव्यामुळे काँग्रेसच्या गोटात सोमवारी प्रचंड अस्वस्थता पसरली. भारताला मोठय़ा प्रमाणावर विमाने विकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या स्वीडनमधील एका कंपनीने केलेल्या संबंधित व्यवहारात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा दावा विकिलिक्सच्या ताज्या केबलमध्ये करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेसने हा दावा फेटाळून लावताना विकिलिक्सवर खोटेपणाचा आरोप केला, दुसरीकडे भाजपने या प्रकरणी काँग्रेस व गांधी परिवारावर जोरदार टीका केली.
या केबलमध्ये विकिलिक्सने म्हटले आहे की, स्वीडनच्या दूतावासाकडून आम्ही मिळविलेल्या माहितीनुसार व्हीगेन या स्वीडिश बनावटीच्या लढाऊ विमानांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थ या नात्याने इंदिरा गांधी यांचा मोठा मुलगा म्हणजे राजीव गांधी हे सक्रिय होते. या प्रकारच्या व्यवहारात राजीव यांचे नाव प्रथमच समोर आले. मात्र, या माहितीला पुष्टी देणारा पुरावा अथवा अतिरिक्त माहिती आमच्याकडे नाही, असा खुलासाही विकिलिक्सने केला.
ही केबल २१ ऑक्टोबर १९७५ या तारखेची असून राजीव गांधी पंतप्रधान होण्याच्या किती तरी आधीच्या या घडामोडी असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या आशयाची बातमी देशातील एका इंग्रजी वृत्तपत्रात सोमवारी प्रसिद्ध झाल्याने काँग्रेसपुढील डोकेदुखी वाढली. काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी या आरोपाचे खंडन केले. विकिलिक्सने केलेला हा दावा पूर्णपणे निराधार असून प्रसारमाध्यमांनी सवंग प्रसिद्धी आणि अल्पकालीन लोकप्रियतेच्या मागे धावू नये, असे आवाहन मी करतो, असे द्विवेदी यांनी सांगितले.