Rajiv Kumar : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केले. ७० आमदार असलेल्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळी नाव न घेता राजीव कुमार यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईव्हीएमबाबत आणि विरोधकांच्या आरोपांबाबत काय म्हणाले राजीव कुमार?

दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, ईव्हीएम मधील छेडछाड, मतदार याद्यांमधील घोळ आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या पाच तासांत मतदानाची टक्केवारी कशी वाढली याबाबतही स्पष्टीकरण दिले. दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “ईव्हीएममध्ये कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हेच सांगितले आहे की, ईव्हीएम टेम्परिंगचे आरोप निराधार आहेत.” असं राजीव कुमार म्हणाले. दरम्यान राजीव कुमार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली.

राजीव कुमार नेमकं काय म्हणाले?

आरोप करताना हवेत गोळीबार करण्याची गरज नाही. तुम्ही पुरावा दाखवा, या ठिकाणी असं घडून येतं आहे हे सांगा आम्ही कारवाई करु. मागच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दरम्यान एक हो हल्ला पाहण्यास मिळाला. तो म्हणजे आमचं हेलिकॉप्टर तपासत आहात, त्यांचं का नाही तपासलं? यांचं का नाही तपासलं? घाणेरड्या भाषेचा उपयोगही केला गेला. आम्ही उत्तर दिलं नाही संयम ठेवला. मतदानाच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना धमक्या देण्यापर्यंत काहींची मजल गेली. मात्र आम्ही शांत बसलो. स्टार प्रचारक आणि राजकीय नेते यांनी शिष्टाचार आणि सभ्यता पाळली पाहिजे. महिलांच्या विरोधात बोलू नका, मुलांच्या विरोधातही काहींनी भाष्य केलं. अशा लोकांना आमची हात जोडून विनंती आहे की प्रचाराची पातळी एवढी घसरु देऊ नका की त्यामुळे मतदानाला येण्याची नव्या पिढीची इच्छाच निघून जाईल. प्रचाराच्या वेळी शालीनता ठेवली पाहिजे. असं म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसंच ज्या नेत्यांनी महिलांचं नाव घेऊन आक्षेपार्ह वाक्यं वापरली त्यांनाही सुनावलं आहे.

हे पण वाचा- Delhi Elections: दिल्लीत पुन्हा रणसंग्राम, काय होते गेल्या पाच निवडणुकांचे निकाल? वाचा सविस्तर

उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीचं प्रकरण काय?

उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी गेले असताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली . त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा सवाल संबंधितांना केला. त्यावर, तुम्हीच पहिले आहात असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असता, दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ स्वत:च शुट केला. हीच घटना सलग तीन दिवस झाली. त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. आता राजीव कुमार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv kumar chief officer of election commission of india said this thing about uddhav thackeray helicopter checking without taking his name scj