नोकिया या जगातील अग्रगण्य कंपनीने आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजीव सुरी या भारतीय व्यक्तीची निवड जाहीर केली आहे.
नोकिया मोबाइल नुकताच मायक्रोसॉफ्ट कंपनीत विलीन करण्यात आला. विशेष म्हणजे नोकियाप्रमाणेच त्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरादेखील भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांच्याकडेच आहे.
४६ वर्षीय राजीव सुरी हे भारतीय नागरिक असून ते १९९५ पासून नोकियामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा २० वर्षांचा अनुभव लक्षात घेता, नोकिया आपला मोर्चा आता ‘वायरलेस नेटवर्क उपकरण’ निर्मितीच्या क्षेत्रात वळवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकेकाळी नोकियाचा ‘वायरलेस नेटवर्किंग’ विभाग तोटय़ात होता. मात्र खर्चकपातीची आणि तोटय़ात असलेले विभाग बंद करण्याची कठोर उपाययोजना करून सुरी यांनी या युनिटला भरघोस नफा कमावून दिला.
नाडेला आणि सुरी
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याप्रमाणेच सुरी यांनीही मंगलोर विद्यापीठातून अभियंत्याची पदवी मिळवली आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन’ या विषयात विशेष प्रावीण्य संपादन केले आहे. या निवडीमुळे पेप्सीकोच्या अध्यक्षा इंद्रा नूयी, रेकीट बेंकिसरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश कपूर, मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी अजय बंगा आणि डय़ईश बँकेचे अंशू जैन यांच्या पंक्तीत बसण्याचा मान सुरी यांना मिळाला आहे.
आव्हान व्यवसाय विस्ताराचे..
एकेकाळी जागतिक मोबाइल विक्रीत ५० टक्क्यांचा वाटा असलेल्या नोकिया मोबाइलला गेल्या पाच वर्षांत घसरणीला सामोरे जावे लागले. त्यामुळेच नेटवर्किंग, दिशादर्शन (मॅप्स अँड नेव्हिगेशन) आणि बौद्धिक स्वामित्व हक्कांचे परवाने या तीन क्षेत्रांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे आव्हान राजीव सुरी यांच्यासमोर असेल. त्याच दृष्टीने नोकियाने ‘ज्युनिपर नेटवर्क्स इन्कॉर्पोरेशन’शी नुकतीच भागीदारी जाहीर केली आहे.