दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर छत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता गुजरातच्या राजकोट विमानतळावरही अशाच प्रकारची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळावरील प्रवाशांच्या पिकअप-ड्रॉप पॉईंटवरील छताचा एक भाग कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हेही वाचा – दिल्ली विमानतळावर छत कोसळून एकाचा मृत्यू, मुसळधार पावसानं राजधानीला झोडपलं

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे उद्गघाटन करण्यात आले होते. १४० कोटी रुपये खर्च करून या विमानतळाचा विस्तार करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे आता भागातील छत कोसळले आहे. त्यामुळे विमानतळाच्या बांधकामावरावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी दिल्ली विमानतळावरही अशाच प्रकारची घटना घडली होती. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर अन्य तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील सर्व विमानतळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये डूमना विमानतळावरील पीकअप-ड्रॉप भागातील छत फुटल्याने याठिकाणी पाणी साचले होते.