पक्षात कुचंबणा होत असून आपल्याला कवडीचीही किंमत दिली जात नसल्याने भाजपचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त पसरल्याने सिद्धू यांची समजूत काढण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह पुढे सरसावले आहेत.
राजनाथसिंह यांनी शुक्रवारी सकाळी सिद्धू यांच्याशी संपर्क साधला आणि तक्रारींची दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांना दिल्याचे भाजपतील सूत्रांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर सिद्धू राजनाथसिंह यांची भेट घेणार आहेत. पक्षात आपल्याला कवडीची किंमत दिली जात नसल्याबद्दल सिद्धू गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असून, राजनाथसिंह यांनी आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या यादीतूनही सिद्धू यांना वगळल्याने प्रकरण अधिकच चिघळल्याचे बोलले जाते. नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना सिद्धू भाजपचे चिटणीस होते. पंजाबचे मंत्री विक्रमजित मजिठिया आणि अकाली दलाच्या नेत्यांसमवेत तीव्र मतभेद निर्माण झाल्याने सिद्धू यांना आपला मतदारसंघही बदलून हवा आहे. त्यावरही चर्चा होणार आहे.

Story img Loader