लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वीच काँग्रेस व भाजपने परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचे शस्त्र उगारले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाने तितक्याच आक्रमकतेने आज प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने देशात फूट पाडून घराणेशाही निर्माण केली. काँग्रेसच सर्वात मोठा जातीयवादी पक्ष आहे, असा प्रतिहल्ला भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी चढवला. नरेंद्र मोदी यांना चहा विकणारा संबोधणारे सरंजामी मानसिकतेत जगत असल्याची टीका करत राजनाथ सिंह यांनी मणिशंकर अय्यर यांना लक्ष्य केले. भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर राजनाथ सिंह बोलत होते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे भाषण रविवारी होणार आहे.
विरोधी पक्ष जातीयवादी असल्याची टीका सोनिया व राहुल गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनात केली होती. त्यावर संतप्त झालेल्या राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना झोडपून काढले. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम करणाऱ्या काँग्रेसनेच देशात फूट पाडली. धर्माच्या नावावर लांगूलचालन केले. त्यामुळे काँग्रेसला कंटाळलेला देश परिवर्तनाची वाट पाहत आहे. देशाच्या मानसन्मान व स्वाभिमानासाठी सत्तापरिवर्तन करा, अशी साद राजनाथ सिंह यांनी देशभरातून आलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांना घातली. ते म्हणाले, महात्मा गांधींनी स्वदेशी, स्वभाषा व ग्रामसभेचा विचार देशाला दिला. काँग्रेसने हा विचार कधीही अमलात आणला नाही. याउलट भाजपने या विचारांनीच प्रेरित होऊन कार्य केले. त्यामुळे जे गांधीजींचे झाले नाहीत; ते देशाचे काय होणार? स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करण्याचे गांधीजींचे स्वप्न होते. भाजप ते सत्यात उतरवेल.
आणीबाणी पर्वाची आठवण करून देताना राजनाथ सिंह यांनी रामलीला मैदानाचा ऐतिहासिक संदर्भ सांगितला. याच मैदानावरून जयप्रकाश नारायण यांनी ‘सिंहासन खाली करो, जनता आ रही है’, ही घोषणा दिली होती. आज त्याच मैदानावरून हाच संदेश भाजपला द्यायचा आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. दिल्लीसह नजीकच्या राज्यांना शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे थंडी प्रचंड वाढली होती. रामलीला मैदानावर अस्थायी स्वरूपात भव्य मंडप उभारण्यात आला होता. तरीही थंडी जाणवत होती, परंतु कार्यकर्ते पूर्णवेळ मंडपात उपस्थित होते.
पुढे व्हा..शनिवारी लालकृष्ण अडवाणी दिल्लीत पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीस ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी आले असता, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी त्यांना अदबीने व्यासपीठाकडे जाण्यास सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा