गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह हे उत्तर प्रदेशातील लखनौ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त ही अफवा असल्याचे सांगत पक्षाचे खासदार लालजी टंडन यांनी हे वृत्त फेटाळून लावले. टंडन हे लखनौ लोकसभा मतदारासंघातूनच लोकसभेवर निवडून गेले आहेत.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लखनौ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी मोदी किंवा राजनाथसिंह हे या जागेवरून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यापार्श्वभूमीवर हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचा खुलासा लालजी टंडन यांनी केला. या जागेवरून आपणच पुन्हा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मोदी, राजनाथसिंह, मुरली मनोहर जोशी आणि कलराज मिश्रा हे या जागेवरून निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे वृत्त मी वाचले आहे. हे वृत्त कोणी पसरवले, ते मला कळत नाही. सध्यातरी ही अफवा आहे, असेच मला म्हणावे लागेल. या जागेवरून अन्य कोणाला तिकीट देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असता, तर त्याबद्दल मला नक्कीच कळविण्यात आले असते. आतापर्यंत तरी या विषयावर माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नाही.

Story img Loader