देशातील अंतर्गत सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी कोणती वेगळी पावले उचलता येतील, याचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी देशातील निमलष्करी दलांचे आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या प्रमुखांना केली. गृहमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच अंतर्गत सुरक्षा सांभाळणाऱया विविध दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख असिफ इब्राहिम आणि रिसर्च अॅंड अॅनालिसिस विंगचे प्रमुख अलोक जोशी हे उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी वेगळे काय करता येईल, याचा आराखडाच तयार करण्याची सूचना त्यांनी दिली. शेजारील देशांसोबतचा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी काही कल्पना असतील, तर त्यांचाही या आराखड्यात समावेश करण्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

Story img Loader