नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी विशिष्ट उपकरणांच्या साह्याने पाळत ठेवण्यात आल्याचे वृत्त साफ खोटे असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. राजनाथ सिंह यांनी बुधवारी राज्यसभेत याविषयी स्पष्टीकरण देताना या बातम्या निराधार असल्याचे सांगितले. स्वत: नितीन गडकरी यांनी या वृत्ताचा इन्कार करत, हे वृत्त कपोलकल्पित असल्याचे म्हटले होते.



काही दिवसांपूर्वी १३ तीन मूर्ती मार्गावरील गडकरींच्या निवासस्थानी शयनकक्षात टेहळणीचे उपकरण आढळल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी संसदेत याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी बुधवारी राज्यसभेत याबद्दलचे स्पष्टीकरण देत प्रसारमाध्यमांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. मात्र, राजनाथ सिंह यांच्या स्पष्टीकरणावर नाराजी जाहीर करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे काही काळासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.