पंतप्रधानांबद्दल खरोखरच आदर वाटत असेल तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्याकडून उपाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा किंवा माफी मागावी अशा शब्दांत भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सोनियांना प्रत्युत्तर दिले. दोषी आढळलेल्या लोकप्रतिनिधींना वाचवण्यासाठी अध्यादेशाच्या मुद्दय़ावर राहुल यांनी सरकारला सुनावले होते. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.भाजपने पंतप्रधानांचा अवमान केल्याच्या सोनिया गांधी यांच्या आरोपाने आश्चर्य होते. त्यापेक्षा परदेशात असताना पंतप्रधानांची खिल्ली उडवली म्हणून राहुल यांचा राजीनामा घ्यावा, असा सल्ला राजनाथ सिंह यांनी दिला.
दहशतवाद थांबेपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नको
कोलकाता : पाकिस्तानच्या भूमीतून घडविण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत त्या देशाशी चर्चा करू नये, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी व्यक्त केले आहे.जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया आणि न्यूयॉर्कमध्ये चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही. त्यामुळे दहशतवाद थांबविण्यासाठी पाकिस्तानकडून पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत किमान पंतप्रधानांच्या पातळीवरील चर्चेला सुरुवात करू नये, असेही राजनाथसिंह म्हणाले. पाकिस्तानबाबत आपल्या पक्षाचे धोरण काय, असे विचारले असताना राजनाथसिंह म्हणाले की, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला शेजारी देशाशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. मात्र शेजाऱ्याच्या वर्तणुकीत त्यासाठी सुधारणा होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader