नितीन गडकरी यांच्यावर मालमत्तेच्या अनुषंगाने झालेले आरोप आणि पक्षांतर्गत वाढते मतभेद या आव्हानांच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नवीन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांची बिनविरोध निवड झाली.
राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. पक्षाची प्रतिमा उजळविणे आणि नैतिकतेच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड न करणे हे राजनाथ सिंह यांच्यासमोरील मुख्य आव्हान असेल, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्यानंतरही अडवाणींच्या नाराजीमुळे अध्यक्षपदाची दुसरी संधी नितीन गडकरी यांना गमवावी लागली.
अडवाणी यांनी या वेळी, भाजप हा भिन्न पक्ष असून मतभिन्नता असलेला पक्ष नाही हे ठसविणारे कार्य आता करावे लागेल, अशी अपेक्षा अडवाणी यांनी या वेळी व्यक्त केली. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजनाथ सिंह यांच्याकडूनच अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या नितीन गडकरींना आपली सूत्रे पुन्हा एकदा राजनाथ सिंह यांच्याच हाती सोपवावी लागली.
मंगळवारच्या नाटय़मय घडामोडींनंतर पक्षाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र अखेर निवडणुकीसाठी कोणीही अर्ज दाखल न केल्याने राजनाथ सिंह यांचा मार्ग मोकळा झाला. ६१ वर्षीय सिंह यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंह यांना शुभेच्छा देताना त्यांच्यामुळे नेतृत्व तसेच प्रशासनाला अनुभवाची झळाळी प्राप्त होईल, असे ट्विटरवर नमूद केले. तसेच रालोआ सरकारमध्ये कृषिमंत्री असलेल्या राजनाथ यांच्या त्याही अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

Story img Loader