भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर येथे भाजपचा पंतप्रधानपदाचा भावी उमेदवार कोण, यावरून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तथापि, दोन्ही नेत्यांनी त्याबाबत मौनच पाळले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गोव्यात आले आहेत. दाभोळ विमानतळावरून राजनाथ सिंग हे बैठकीच्या ठिकाणी आले असता त्यांना पत्रकारांनी घेरले. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती ठीक नसल्याने ते शनिवारी येथे येणार असल्याचे राजनाथ सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास राजनाथ सिंग यांनी नकार दिला. मोदी यांनीही आपल्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. पक्षाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला येथे शनिवारपासून सुरुवात होणार असून शुक्रवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

अडवाणींच्या अनुपस्थितीबाबत तर्कवितर्क लढवू नका – नायडू
पणजी : भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अनुपस्थित राहिले असले तरी मीडियाने त्याबाबत विविध तर्कवितर्क लढवू नयेत, असे पक्षाचे नेते व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.अडवाणी हे शनिवारी गोव्यात येणार असून ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. अडवाणी यांची प्रकृती ठीक नसल्याने ते शुक्रवारी हजर राहू शकले नाहीत, असे नायडू यांनी स्पष्ट केले.पक्षात सर्व आलबेल आहे, पक्षाला जे निर्णय घ्यावयाचे आहेत ते बैठकीत घेतले जातील, असेही नायडू म्हणाले. उमा भारती, वरुण गांधी हे बैठकीला हजर नाहीत, असे निदर्शनास आणण्यात आले, तेव्हा नायडू म्हणाले की, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे हे नेते गोव्यात आलेले नाहीत.

देशवासीय एनडीए  सरकारच्या प्रतीक्षेत-पर्रिकर
पणजी : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार केंद्रात सत्तेवर यावे याची देशवासीयांना प्रतीक्षा असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पर्रिकर यांनी पणजीत आयोजित केली आहे. देशात उत्तम कारभार व्हावा यासाठी एनडीएचे सरकार सत्तेवर येण्याची देशवासीयांना प्रतीक्षा आहे. देशाला उत्तर प्रशासनाची गरज आहे. लोकसभेच्या निवडणुकीला आता काही महिन्यांचा अवधी राहिला असल्याने पक्षाची ही बैठक निवडणूकजिंकण्यासाठी पथदर्शक ठरेल, असा विश्वासही पर्रिकर यांनी व्यक्त केला.

Story img Loader