पाश्चात्य जगातील ‘दिल माँगे मोर’ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत बसणारी नाही. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी ‘दिल माँगे मोअर’ किंवा भारतीय मूल्ये यांपैकी एकाची निवड करावी असे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते शुक्रवारी दिल्लीच्या ‘श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स’ महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते. केवळ पाश्चात्य देशच हे ज्ञानाचे भांडार असल्याची भारतीय विद्यार्थ्यांची समजूत बदलली पाहिजे. त्यासाठी देशातील शिक्षणव्यवस्थेत सर्वसमावेशक बदल होण्याची गरज राजनाथ यांनी व्यक्त केली. देशातील सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे भारतापेक्षा परदेशात विज्ञान, तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षण चांगल्याप्रकारे मिळू शकते, असे विद्यार्थ्यांना वाटते. मात्र, विद्यार्थ्यांनी या भ्रमातून बाहेर पडावे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, भारताकडे प्राचीन काळापासूनच हे सगळे ज्ञान आहे. भारतीय संस्कृतीच्या प्राचीन ग्रंथांमध्ये सर्व तत्त्वांचा आणि उत्तरांचा समावेश असून भारत हा जगद्गुरु असल्याचे यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटले. इतकेच काय भारताच्या ‘शेजारील पंडीत’ हेदेखील नासातील तज्ज्ञांपेक्षा उजवे आहेत. नासातील तज्ज्ञ सूर्य आणि चंद्राच्या स्थितीचा अंदाज एका महिन्यापूर्वी व्यक्त करतात. मात्र, आपल्या देशातील पंडित पंचागांच्याआधारे पुढील १०० वर्षांसाठीचे अंदाज व्यक्त करू शकतात असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा