संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्नीवीर योजनेबद्दल मोठं वक्तव्य केलं. दिल्लीत आयोजित एका खासगी कार्यक्रमात संरक्षणमंत्री सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला. तसेच उपस्थितांना अनेक किस्सेदेखील ऐकवले. राजनाथ सिंह यावेळी म्हणाले, भारताच्या सर्व सीमा सुरक्षित आहेत. आपल्या देशातील नागरिकांचा देशाच्या सैन्यदलांवर विश्वास असायला हवा. अग्नीवीर योजनेवर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. तसेच सुरक्षेच्या विषयावर बोलण्याची ही जागा नाही. तरीदेखील मी एवढंच सांगेन की, आवश्यकता पडल्यास केद्र सरकार अग्नीवीर भरती योजनेत परिवर्तन करण्यास तयार आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, ही योजना बनवताना आपल्या सरकारने अग्नीवीरांचं भविष्य सुरक्षित असल्याची खात्री केली आहे. आपल्या सैन्यात अधिकाधिक तरुण असावेत, कारण मला वाटतं की, तरुण अधिक उत्साही असतात, तसेच तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ते पुढे गेले आहेत. त्यांचं भविष्य सुरक्षित आहे. योजना तयार करताना आम्ही त्यांची काळजी घेतली आहे आणि आवश्यकता असल्यास आम्ही या योजनेत बदलही करू.
लडाख, अरुणाचल प्रदेशसह अनेक ठिकाणी भारत आणि चीनच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. यामुळे भारत-चीन सीमाप्रश्न ताणला गेला आहे. सीमाप्रश्नावरून विरोधी पक्ष केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, देशाच्या हिताचं जे काही असेल ते मी आणि आपलं मंत्रालय विरोधकांबरोबर शेअर करतो. परंतु, काही गोष्टी अशा आहेत ज्या सार्वजनिकरित्या जाहीर करता येत नाहीत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी गुलदस्त्यात असलेल्याच बऱ्या. त्यामुळे काही मुद्द्यांवर मी जाहीरपणे बोलणं टाळतो.
हे ही वाचा >> Agniveer Recruitment 2024: भारतीय सैन्यात नोकरी करण्याची मोठी संधी; अग्निवीर भरतीसाठी लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
अग्नीवीर योजना काय आहे?
अग्नीवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्नीवीर म्हणून सेवेची संधी दिली जात आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) या तरुणांना सैन्यदलात समाविष्ट करून घेतलं जातं. या योजनेंतर्गत सैन्यात दाखल होणाऱ्या जवानांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) दिलं जातं. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ करण्याची तरतूद आहे. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागेल. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील. भरतीत इच्छुकांना आवश्यक त्या वैद्यकीय पात्रता पूर्ण कराव्या लागतील. पहिल्या वर्षी ४६ हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती करण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कामगिरीच्या आधारे त्यांना स्थायी सेवेत दाखल होता येईल. प्रत्येक तुकडीतील २५ टक्के अग्निवीरांना या पद्धतीने स्थायी सेवेत स्थान दिलं जाणार आहे.