भारत गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानमधून भारताविरोधात होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. परंतु, अलीकडच्या काळात भारताच्या संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना वेसण घातली आहे. यावर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं आहे. तसेच ते म्हणाले, भारतात दहशतवादी कारवाया करून कोणी पाकिस्तानात पळून गेला तर आम्ही त्याला पाकिस्तानात घुसून मारू. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, आमच्या शेजारच्या देशातून आपल्या देशात दहशतवादी कारवाया होत असतील, आपल्या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ.

मुलाखतकार म्हणाले, अमेरिकेतील गार्डियन नावाच्या एका प्रकाशनाने भारत आणि पाकिस्तानविषयी एक लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात दावा करण्यात आला आहे की, भारताने अलीकडच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये काही कारवाया करून २० हून अधिक लोकांना मारलं आहे. भारत केजीबी (रशियाची गुप्तचर यंत्रणा) आणि मोसादप्रमाणे काम करतोय. याबाबत तुम्ही काय सांगाल? या प्रश्नावर राजनाथ सिंह म्हणाले, कोणीही आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ. कोणी भारतात दहशतवादी कारवाया केल्या आणि पळून पाकिस्तानला गेला तर आम्ही त्याला पाकिस्तानमध्ये घुसून मारू.

राजनाथ सिंह म्हणाले, भारताची ताकद किती आहे हे आता पाकिस्तानलाही समजलं आहे. भारत शक्तीशाली आहे. त्याचबरोबर भारत आपल्या शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही इतिहासाची पानं चाळून पाहा, तुम्हाला कळेल की आजतागायत भारताने कुठल्याही देशावर आक्रमण केलेलं नाही, अथवा तसा कधी प्रयत्नदेखील केलेला नाही. भारताने जगातल्या कोणत्याही देशाच्या एक इंच जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु, भारताकडे कोणी डोळे वटारले, भारतात दहशतवादी कारवाया केल्या तर त्यांची काही खैर नाही.

हे ही वाचा >> पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?

पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरचा सुमारे चार वर्षांचा सीमावाद आणि हिंदी महासागरात चिनी सैन्याच्या प्रवेशाबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं होतं. तेव्हा राजनाथ सिंह म्हणाले होते, “भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास, भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुसज्ज, सक्षम आणि तयार आहेत.” संरक्षणमंत्री एका संरक्षण परिषदेत ते बोलत होते.

Story img Loader